Friday, 8 June 2018

एसटी संपकाळात, परिवहन, पोलिस व महसूल प्रशासन या सर्व विभागांनी आपापसात समन्वय ठेवावा ! जिल्हाधिकारी-किशोर राजे निंबाळकर


        जळगाव दि. 8 :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी पहाटे 8 जुन पासून आकस्मीक संप सुरु केला आहे. संपकाळात जनतेची गैरसोय होवू नये, प्रवाशांचे हाल होवू नयेत यासाठी एसटी, परिवहन, पोलिस व महसूल प्रशासन या सर्व विभागांनी आपापसात समन्वय ठेवण्याच्या व 24 तास सज्ज राहण्याच्या सुचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज घेतलेल्या उपाययोजनासंदर्भात बैठकीत दिल्या. या बैठकीस पोलिस अधिक्षक श्री दत्तात्रय कराळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री जयंत पाटील, एस.टी.चे विभाग नियंत्रक श्री. राजेंद्र देवरे इ. अधिकारी उपस्थित होते.
            या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एस.टी.च्या सेवेवरील परिणामाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यामध्ये एस.टी.च्या एकूण 11 आगारांचा समावेश असून त्याद्वारे दररोज सुमारे साडेतीन लाख प्रवाशांची वाहतूक महामंडळामार्फत करण्यात येते. त्यापैकी केवळ 3 आगारामध्ये संपामुळे वाहतूक बंद असून जळगाव, मुक्ताईनगर व अमळनेर आगारामध्ये वाहतूक सुरळीत आहे. उर्वरित 7 आगारामध्ये वाहतूक अंशत: सुरु असल्याची माहिती विभाग नियंत्रक श्री राजेंद्र देवरे यांनी दिली.
उपाययोजना :
            प्रवाशांना संपाची झळ पोहचू नये यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. शासनाने मोटार अधिनियमाचे कलम 66 (3) (एन) अन्वये वाहनांना परवान्यातून सुट देवून सर्व प्रकारच्या खाजगी व भाडोत्री वाहनांना प्रवाशांची वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील सर्व खाजगी प्रवाशी बसेस, स्कुल बस कंपन्यांच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहने यांचा समावेश  आहे. उप प्रादेशीक परिवहन विभागाची पथके तयार करण्यात आली असून त्यांच्याद्वारे उपरोक्त नमुद वाहनांची प्रवासी वाहतूकीसाठी सोय करण्यात येत आहे. सदर पथके प्रामुख्याने चोपडा, यावल, चाळीसगाव, भडगाव, जामनेर इ. ठिकाणी कार्यरत आहेत. रात्रीच्या वेळी लांब पल्ल्यांच्या मार्गासाठी एसटी महामंडळाच्या शिवशाही इ. हायएंड बसेस आणि अन्य खाजगी बसेसची सोय करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील 11 आगारासाठी नियंत्रण कक्ष, विभागीय कार्यालय, एस.टी. महामंडळ जळगाव येथे स्थापन करण्यात आला असून, सदर नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 0257-2220181 असा आहे. प्रवाशांना पर्यायी सेवा उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होवू नयेत यासाठी वाहतूक पोलिस व स्थानिक पोलिसांची पथके जिल्ह्यांमध्ये प्रत्येक डेपोजवळ व अन्य ठिकाणी कार्यरत ठेवण्यात आलेली आहेत.
        कर्मचाऱ्यांवर कारवाई :- कोणतीही नोटीस न देता अचानक संप करणाऱ्या प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या व एसटीच्या सेवांवर अनिष्ठ परिणाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी यांनी  विभाग नियंत्रक श्री. देवरे यांना दिले.
00000

No comments:

Post a Comment