Monday, 13 August 2018

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या युवा माहिती दूत उपक्रमाचा 15 ऑगस्ट रोजी शुभारंभ


            जळगाव, दि. 13 (जिमाका वृत्तसेवा) :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत युवा माहिती दूत असा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या युवा माहिती दूत उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बुधवार, 15 ऑगस्ट, 2018 रोजी सकाळी 9.30 वाजता राज्याचे कृषि व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण करुन होणार आहे.
            शासनाच्या विकास योजनांची माहिती गाव पातळीपर्यंत लाभार्थ्यांना मिळावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला जात आहे. माहिती दूत त्यांच्या तालुक्यातील 50 कुटुंबांशी समक्ष संपर्क साधून शासकीय योजनांची माहिती देणार आहेत. युवा माहिती दूतांची नोंदणी महासंचालनालयाने तयार केलेल्या ॲपवर ऑनलाईन होणार आहे. हे ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध असेल. प्ले स्टोअर वरुन हे ॲप डाऊनलोड करुन युवा माहिती दूत म्हणून नोंदणी करता येणार आहे. या युवा माहिती दूतांना विकास योजनांवरील व्हीडीओ क्लिप, शासकीय योजनांची माहिती असणाऱ्या पुस्तिका, घडीपत्रिका महासंचालनालयामार्फत पुरविण्यात येणार आहेत. 15 ऑगस्ट नंतर सहा महिन्याच्या कालावधीत माहिती दूतांनी 50 कुटुंबाशी समक्ष संपर्क साधून त्यांना विकास योजनांची माहिती द्यावयाची आहे. तसेच डाऊनलोड केलेल्या ॲपवर कुटुंबाशी भेट दिल्याबाबतची माहिती अपलोड करावयाची आहे. प्रत्येक तालुक्यात एक समन्वयक निवडला जाणार आहे. जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके हे या उपक्रमाचे समन्वयक अधिकारी म्हणून काम पाहणार आहे.
            15 ऑगस्ट, 2018 रोजी आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील युवक-युवती तसेच युवा माहिती दूत म्हणून इच्छुक व्यक्तींनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 0257- 2229628 या दुरुध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांनी केले आहे.
000

No comments:

Post a Comment