जळगाव, दि. 4 - महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व
संरक्षण) नियम 2018 अन्वये ज्या अशासकीय स्वयंसेवी संस्था बालकांच्या संस्था
चालविण्यास इच्छुक आहेत त्यांना नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करणेसाठी दि. 30 ऑगस्ट,
2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी
माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर यांनी दिली आहे.
ज्या
संस्थांनी नोंदणी प्रमाणपत्रासाठी यापूर्वीच प्रस्ताव सादर केलेले आहेत. त्या
प्रस्तावांची छाननी करुन छाननी पत्राच्या प्रती www.womenchild.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर
बातम्या व सूचना या सदराखाली उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. ज्या संस्थांच्या
प्रस्तावात त्रुटी आहेत अशा संस्थांनी त्या त्रुटींची पुर्तता करुन त्रुटी पुर्ततेचा
अहवाल दि. 30 ऑगस्ट, 2018 पर्यंत आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, 28 राणीचा
बाग, जुना सर्किट हाऊस, पुणे येथे पाठविणे
आवश्यक आहे. त्यानंतर पाठविलेले अहवाल स्वीकारले जाणार नाहीत.
तसेच यापूर्वी दिलेल्या मुदतीत ज्या संस्थांना प्रस्ताव सादर करता
आले नाही. अशा इच्छुक संस्थांना प्रस्ताव सादर करण्यासाठी दि. 30 ऑगस्ट, 2018
पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशा संस्थांनी नोंदणी प्रमाणपत्राबाबतचे प्रस्ताव
www.womenchild.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा
महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, आकाशवाणी
चौक, जळगाव या कार्यालयाशी दूरध्वनी क्रमांक 0257-2228828 वर संपर्क साधावा. असे
आवाहन श्री. काटकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांचेमार्फत करण्यात
येत आहे.
०००
No comments:
Post a Comment