मुंबई,
दि. 21 - विकास व्हावा पण तो कुठल्याही विनाशाशिवाय ही संकल्पना स्वीकारत
महाराष्ट्राने शाश्वत विकासाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली असून
महाराष्ट्राच्या वन विकासात लोकसहभाग अमूल्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय
वन दिनाचे औचित्य साधत संत तुकाराम वनग्राम पुरस्कारांचे वितरण तसेच वनसेवेत
उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव आज मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार,
पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, आमदार मंगलप्रभात लोढा, मुख्य
सचिव सुमित मल्लिक, वन विभागाचे सचिव विकास खारगे, वन विकास महामंडळाचे अध्यक्ष
चंदेलसिंह यांच्यासह पुरस्कार प्राप्त गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांचे
सदस्य तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
वनमंत्री
सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाने मागील तीन वर्षात लक्षणीय काम
केल्याने महाराष्ट्र वनक्षेत्रात देशपातळीवर चार क्षेत्रात पहिल्या स्थानावर
आल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, वनेत्तरक्षेत्रात 2015 ते 2017 या
कालावधीत 273 चौ. कि. मी. ची वाढ झाली आहे. पर्यावरण संतुलनाच्या कामात वन
विभागाने महत्वाचा वाटा उचलला आहे. वन वाचतील ती नागरिक आणि समाजाच्या सहभागातून हे
वास्तव स्वीकारून वन विभागाने लोकसहभाग मिळवला, स्वंयसेवी संस्था, संघटना,
समाजातील सर्व स्तरातील लोक एकत्र केले आणि या माध्यमातून वन विकासाच्या संकल्पामागे
एक मोठी फळी निर्माण केली. हे जंगल, हे वन आपलं आहे ही भावना लोकमनात निर्माण
करण्यात वन विभाग यशस्वी ठरला. यासाठी वन विभागाचे सर्व अधिकारी- कर्मचारी,
संयुक्त वन व्यवस्थापन समित्या अभिनंदनास पात्र असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
संकल्प
करणे सोपे परंतू तो अंमलात आणणे कठीण असते असे सांगून 50 कोटी वृक्ष लागवडीच्या
संकल्पाची याच लोकसहभागाच्या सुत्रातून पूर्तता होईल असा विश्वास वाटत असल्याचे
मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले, आता वृक्ष लागवड एक लोकचळचळ झाली आहे. वन
आणि वन्यजीव संवर्धनातून रोजगार निर्मिती होत आहे. इको टुरिझम मुळे
वनक्षेत्रातील आणि वनालगतच्या गावातील लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी
उपलब्ध होत आहेत. निसर्गाशी साधर्म्य राखून आपल्या अनेक पिढ्या वर्षानूवर्षे
जगल्या. हेच संचित आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचे आहे. निसर्गाशी आपलं
नातं काय आहे हे सांगणाऱ्या संत तुकारामांनी “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे” असं सांगत एक बृहत परिवार निर्माण केला. त्यांचा हा शाश्वत विचार आपल्याला
समाजातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवायचा असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
जगण्यासाठीच्या आवश्यकतेमध्ये वन विभाग पहिला - सुधीर
मुनगंटीवार
कोणत्याही
राज्यात वन विभाग प्राधान्यक्रमात शेवटून पाचवा मानला असला तरी तो
संपूर्ण जगात जगण्यासाठीच्या ज्या आवश्यकता आहेत, त्यात मात्र पहिल्या क्रमांकावर
आहे असे सांगून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, वृक्षाची जोपासणा हीच
निसर्गाची उपासना आहे. त्यामुळे या विभागाकडे सरकारी विभाग म्हणून पाहू नये. वृक्ष
लावून जगवणे हे एक ईश्वरीय कार्य आहे. पुढच्या पिढीच्या जन्मासाठी पृथ्वीवर वन
ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. वन हा माणसांना जगवणारा विभाग आहे तसाच
तो महसूल मिळवून देणाराही विभाग आहे. महसूल वाढवण्यासाठी उर्जा लागते. ती उर्जा
देण्याचे काम वन विभाग करतो. शुद्ध आचार, शुद्ध विचार आणि शुद्ध वर्तणूकीस
प्रोत्साहन देणाऱ्या आणि “वन से धन तक आणि जल से जीवन के
मंगल तक” संदेश देणाऱ्या वन विभागाला पर्याय नसल्याचेही ते म्हणाले.
“वने आणि शाश्वत शहरे” हे यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय वन दिनाचे घोषवाक्य आहे. शहरांमध्ये वायू प्रदुषण
वाढते आहे, दाटीवाटीच्या घरांनी श्वास कोंडतो आहे, हे टाळायचे असेल तर “फॅमिली फॉरेस्ट” ही संकल्पना प्रत्येकाने स्वीकारण्याची गरज आहे. 50 कोटी
वृक्ष लागवडीत सहभाग नोंदवून प्रत्येकाने यात योगदान द्यायचे आहे. आतापर्यत वन
विभागाच्या महावृक्ष लागवडीत लोकांनी खूप उर्त्स्फूतपणे सहभाग नोंदवला. 2 कोटी
वृक्ष लागवडीचा संकल्प 2 कोटी 81 लाख, तर 4 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प 4 कोटी 83
लाख रोपं लावून पूर्णत्वाला गेला आहे. येत्या पावसाळ्यात राज्यात 13 कोटी वृक्ष
लागवड आपल्या सर्वांना मिळून करावयाची आहे. हा पर्यावरण रक्षणाचा गोवर्धन
उचलण्यासाठी सर्वांचे योगदान अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.
भारतीय
वन सर्वेक्षण अहवालानुसार महाराष्ट्राच्या
वृक्षाच्छादनामध्ये 273 चौ.कि.मी ची वाढ झाली आहे. तसेच घनदाट जंगल क्षेत्रात 51
चौ.कि.मी, कांदळवन क्षेत्रात 82 चौ.कि.मी, जलव्याप्त क्षेत्रात 432 चौ.कि.मी तर
बांबू क्षेत्रात 4462 चौ.कि.मी ची वाढ नोंदविण्यात आली आहे. विकासासाठी वनविभागाची
जागा देण्याचे आव्हान असतांनाही या सर्व क्षेत्रातील वाढ उल्लेखनीय असल्याचे
वनमंत्र्यांनी सांगितले. आज 45 लाख लोक हरित सेनेचे सदस्य झाले आहेत. त्यांना 13
कोटी वृक्ष लागवडीच्या कामात सहभागी करून घेतले जाणार असल्याचे सांगून
वनमंत्र्यांनी हरित महाराष्ट्राचे आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांचे स्वप्नं साकार
करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन काम करूया, असे आवाहन केले.
प्रत्येक
जिल्ह्यात एक वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी असावा अशी अपेक्षा व्यक्त करून
पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी वन आणि पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे कार्य परस्परांना पूरक असल्याचे सांगितले. जनचळवळ काय
करू शकते हे वन विभागातील वृक्ष लागवड मोहिमेने दाखवून दिल्याचेही ते म्हणाले.
मुख्य सचिव सुमित मल्लिक
यांनी राज्यात वाढत्या नागरिकीकरणामुळे अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचे
सांगतांना नागरी जीवन सुखी होण्यासाठी शहरात वाढत्या वनक्षेत्राची गरज व्यक्त
केली. ते म्हणाले की, मुंबईला 12 टक्के पाणी हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील
तुलसी आणि विहार तलावातून मिळते तर उर्वरित 88 टक्के पाणी इतर
पाणलोट क्षेत्रातून. पाणलोट क्षेत्राच्या विकासासाठीही वनांची आवश्यकता असल्याचे
ते म्हणाले. जागतिक तापमान वाढीमुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर वृक्ष लागवड हा
एक पर्याय असून महाराष्ट्रातील वनाचे क्षेत्र 20 टक्क्यांवरुन 33 टक्क्यांपर्यंत
नेण्यासाठी समाजातील सर्व लोकांच्या सहकार्याची गरज आहे. वाढत्या लोकसंख्येचा दबाव
वनक्षेत्रावर आहे अशा परिस्थितीत वनसंरक्षण करणे हे आव्हानात्मक काम असून हे काम
करत असलेल्या वनविभागातील कर्मचारी अधिकारी यांचे त्यांनी अभिनंदन केले.
पाल येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीला सन 2016-17 चा
राज्यस्तरीय संत तुकाराम वनग्राम पुरस्कार प्रदान
आज
झालेल्या समारंभात रावेर तालुक्यातील पाल येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीला सन
2016-17 चा राज्यस्तरीय संत तुकाराम वनग्राम तृतीय पुरस्कार विभागून देण्यात आला. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते दीड लाख रुपयांचा
धनादेश प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार रावेरचे आमदार हरिभाऊ जावळे, रावेरचे वन
परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे, संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष जुम्मा
तडवी, सरपंच जोहराबाई तडवी, सदस्य कामील तडवी, वनरक्षक वैशाली कुंवर यांनी
स्वीकारला.
पाल येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीने
वनांचे संरक्षण करणे व अवैध वृक्षतोड, वनक्षेत्रातील अतिक्रमण, वनवणवा, अवैध चराई
यांना प्रतिबंध केला. तसेच त्यांचे ताब्यात देण्यात आलेल्या वनांचे व्यवस्थापन
करणे, ग्रामीण जनतेमध्ये वनांच्या महत्वांविषयी व्यापक प्रमाणात जागृती निर्माण
केल्याने वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समितीने तृतीय क्रमांकाचे
बक्षिस विभागून दिले.
मा.
मुख्यमंत्री यांच्या हस्ते यावेळी “हरित निर्माणाची तीन वर्षे” या पुस्तकासह इतर 3 पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच वन विभागाच्या
विविध कामांची माहिती देणारी चित्रफीतही यावेळी दाखविण्यात आली. कार्यक्रमात वनसेवेत उत्कृष्ट काम करणाऱ्या 29 अधिकाऱ्यांचा विविध पुरस्काराने
गौरव करण्यात आला. पुणे वनपरिक्षेत्रातील भोर येथील वनरक्षक कै. सदाशिव
त्र्यंबकअप्पा नागठाणे यांचा वन वणवा विझवतांना मृत्यू झाला होता. त्यांना आजच्या
कार्यक्रमात मरणोत्तर सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांनी या
पुरस्काराचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकार केला.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक वन सचिव विकास खारगे यांनी केले. त्यात त्यांनी वन विभागाने मागील तीन
वर्षात हाती घेतलेल्या अनेक महत्वाकांक्षी उपक्रमांची, उल्लेखनीय कामांची माहिती
दिली.
000




No comments:
Post a Comment