जळगाव, दि. 14 -
जिल्हयातील अडचणीतील पतसंस्थांमधील थकीत
कर्जदारांच्या स्थावर मालमत्तांच्या जाहिर लिलाव प्रक्रियेत त्याच पतसंस्थांच्या
ठेवीदारांना त्यांचे ठेव रकमेपोटी बोलीधारक म्हणून भाग घेण्यास सहकार आयुक्त व
निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सशर्त परवानगी दिली आहे. अशी
माहिती विशाल जाधवर, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी एका
प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.
जिल्हयातील
काही पतसंस्था आर्थिकदृष्टया अडचणीत आल्याने त्यांच्या ठेवीदारांना ठेवी परत मिळत
नसल्याने याबाबत विविध स्तरांवर वारंवार तक्रारी होत होत्या तसेच आंदोलने केली जात
होती. सहकार विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून थकीत कर्जाची वसूली करुन
संस्थांच्या स्वनिधीमधून आणि प्रसंगी मालमत्तांच्या विक्रीतून हार्डशीपमधील
ठेवीदारांच्या ठेवी परत करणेबाबत प्रयत्न सुरु आहेत. मात्र कर्जदारांनी
पतसंस्थांची कर्ज भरल्याशिवाय ठेवीदारांच्या ठेवी परत करणे शक्य होत नाही.
त्यामुळे जिल्हयातील अडचणीतील पतसंस्थांमधील अपसेट प्राईस निश्चित करण्यात येत
आहे. या मालमत्तांचा जाहिर लिलाव लावलेल्या थकीत कर्जदारांच्या मालमत्ता तसेच थकीत
कर्जापोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 100 नियम 85 अन्वये
संस्थेच्या नावे वर्ग झालेल्या मालमत्ता ठेवींच्या बदल्यात लिलावात भाग घेऊन बोली
बोलण्यास व खरेदी करण्यास ठेवीदारांना परवानगी मिळण्याबाबत जिल्हा उपनिबंधक,
सहकारी संस्था, जळगाव यांनी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र
राज्य पुणे यांचेकडे प्रस्ताव दाखल केला होता. त्यानुसार या प्रस्तावाला मान्यता
प्राप्त झाल्याचे जिल्हा उपनिबंधकांच्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
मालमत्तेच्या
किंमतीच्या किमान 15% रक्कम त्यांनी रोखीने भरणे आवश्यक असून उर्वरित 85%
रक्कमेसाठी त्या संस्थेतील ठेव पावत्या वर्ग करता येतील. या अटीवर ठेवीदारांना
लिलावामध्ये भाग घेण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
जिल्हयातील
सर्व संबंधीत ठेवीदारांनी परवानगी पत्रातील अटीप्रमाणे सहभाग घेवून त्यांच्या ठेवीच्या
रक्कमांच्या बदल्यात मालमत्ता खरेदी कराव्यात. असे आवाहन श्री. जाधवर, जिल्हा
उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी केले आहे.
०००
No comments:
Post a Comment