Thursday, 1 March 2018

कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची संधी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

           जळगाव, दि. 1 - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 अंतर्गत यापूर्वीच्या विहित कालावधीत अर्ज करण्यापासुन वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी 31 मार्च, 2018 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची सुविधा शासनाने पुन्हा उपलब्ध करून दिली आहे. अशी माहिती विशाल जाधवर, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी दिली आहे.
         जिल्ह्यात यापूर्वी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा 1 ते 31 मार्च, 2018 या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा शासनाने दिलेली आहे. यापुर्वी या योजने अंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाहीत. या कालावधीत आपले सरकार सेवा केंद्रामार्फत शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येतील. किंवा शेतकऱ्यांना https://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर स्वत: नोंदणी करून युजर आय. डी. व पासवर्डच्या आधारे अर्ज सादर करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा शेतकऱ्यांना नि:शुल्क असून अर्ज करणाऱ्या शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे प्रमाणीकरण आधार क्रमांकाच्या आधारे बायोमेट्रीक पध्दतीने किंवा ओटीपीव्दारे केल्यानंतरच संबंधित अर्ज संपूर्ण माहितीसह अपलोड करण्यात येतील.
           या योजनेसाठी करावयाच्या अर्जाचा नमुना जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, तालुका उप/सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक यांचे कार्यालयात तसेच बॅकेच्या शाखेत उपलब्ध असेल. आधार क्रमांकाच्या आधारे बायोमेट्रीक पध्दतीने अर्जदार व कुटुंबियाचे प्रमाणीकरण करण्यात अडचण येत असेल तर सहाय्यक निबंधक कार्यालयाकडुन आधार क्रमांकाची सत्यता पडताळून अर्जदार व त्यांच्या कुटुंबियांचे प्रमाणीकरण करण्यात येऊन त्यांच्यामार्फत देण्यात आलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे आपले सरकार सेवा केंद्रामार्फत संबधितांचे अर्ज माहितीसह अपलोड करण्यात येणार आहे.
    जिल्ह्यात कर्जमाफी योजनेपासुन वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना -2017 अंतर्गत 1 ते 31 मार्च, 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरून या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री. जाधवर, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
                                                                          ०००

No comments:

Post a Comment