Monday, 19 March 2018

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती 62 हजार अर्ज निकाली

             जळगाव, दि. १९ - अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाच्यावतीने देण्यात येणारी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क योजनेतंर्गत जिल्ह्यातील 62 हजार 802 विद्यार्थ्यांच्या अर्ज निकाली काढण्यात आले आहे. 
            जिल्हा सामाजिक विकास शक्ती प्रदत्त समितीची सभा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. सहायक आयुक्त, समाज कल्याण खुशाल गायकवाड, जिल्हा सरकारी वकील ॲङ केतन ढाके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबीता कमलापूरकर, आदिंसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त  खुशाल गायकवाड यांनी ही माहिती दिली.
            अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाच्यावतीने देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी संबंधित महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांचे अर्ज तातडीने प्राप्त करुन घेण्यात आले आहे. सन 2016-17 मध्ये यासाठी 79 हजार 788 अर्जांची नोंद झाली होती. त्यापैकी 34 हजार 650 अर्ज निकाली काढण्यात आले आहे. तर सन 2017-18 मध्ये प्राप्त अर्जांपैकी 28 हजार 152 अर्ज निकाली काढण्यात आले आहे. शिल्लक अर्ज तातडीने विभागाकडे पाठविण्याच्या सूचना सर्व संबंधित महाविद्यालयांना देण्यात आल्याचे श्री. गायकवाड यांनी बैठकीत सांगितले. अर्ज प्राप्त होताच नियमानुसार आवश्यक ती सर्व कार्यवाही तातडीने पूर्ण करुन विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्याची सुचना जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी दिल्यात.
         या बैठकीत शासकीय वसतीगृह, निवासी शाळा, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आधारकार्डचे वाटप, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, शिष्यवृत्ती वाटप, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, रमाई आवास योजना, अनुसूचित जाती उपयोजनांचा आढावा घेण्यात आला.  
         शासकीय वसतीगृह, निवासी शाळा, आश्रमशाळेतील 16 हजार 323 विद्यार्थ्यांना आधारकार्डचे वाटप करण्यात आले आहे. तर अनिवासी आश्रमशाळेतील 334 विद्यार्थ्यांचे आधारकार्ड प्रलंबित आहे. तसेच शासकीय वसतीगृहातील व आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी पूर्ण झाल्याची माहितीही श्री. गायकवाड, सहायक आयुक्त यांनी बैठकीत दिली.   
                                                                     000

No comments:

Post a Comment