Wednesday, 14 March 2018

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व जनजागृती सप्ताहाचे उदघाटन संपन्न




           जळगाव, दि. 14 - महाराष्ट्र आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून आयोजित करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व जनजागृती सप्ताहाचे उदघाटन जिल्हा नियोजन भवनात अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते दीप्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे कार्यकारी अधिकारी राहूल मुंडके, जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी नरविरसिंह रावल, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे एल. यु. पवार, श्री. शर्मा, श्री.  सरदार उपस्थित होते.
          यावेळी जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील (MIDC) तसेच दिपनगर औष्णिक विद्युत निर्मिती कंपनी, भुसावळ व वरणगाव ऑर्डिनन्स फॅक्टरी येथील सुरक्षा अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. त्यांना औद्योगिक क्षेत्रातील अपघात, विषारीवायु गळती, अग्निशमन, शोध व बचावकार्य याबाबत साहित्यांचे प्रात्यक्षिक, एलसीडीद्वारा माहितीपट व व्याख्यानांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी बोलतांना श्री. गाडीलकर म्हणाले की, आपत्तीच्या वेळी आपत्ती व्यवस्थापनाचे सदस्य सर्व यंत्रणा यांचा एकमेकांशी असलेला सम्नवय अतिशय महत्वाचा आहे. समन्वय चांगला असेल तर आपत्तीत नुकसान कमी होते. तसेच जिवित व वित्तहानी कमी होते. श्री. मुंडके म्हणाले की, अशा प्रशिक्षणामुळे प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण होण्यास मदत होते. हे प्रशिक्षण घेणाऱ्या व्यक्तींनी आपल्या परिचयाच्या व्यक्तींना आपत्ती निवारणाबाबतची माहिती संदेशाद्वारे पाठविण्याचे आवाहनही श्री. मुंडके यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपत्ती निवारण अधिकारी श्री. रावल यांनी केले. यावेळी विविध कंपन्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी आपले अनुभव कथन करतांना आपल्या शंकाचे निरसनही करुन घेतले.
    राज्य शासनाने राज्यातील पुर, भुकंप, चक्रीवादळ, दुष्काळ अशा विविध नैसर्गिक व मानव निर्मित आपत्ती निवारणाकरिता व आपत्तीचे  व्यवस्थापन प्रभावीपणे व्हावे. या हेतुने  राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एस.डी.आर.एफ.) स्थापना केली आहे. राज्य राखीव पोलीस गट क्र. 6 धुळे येथील अधिकारी व कर्मचारी या सप्ताहात जिल्हयात विविध ठिकाणी कार्यक्रम घेणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची कंपनी (एस.डी.आर.एफ.) आपत्तीच्या स्थळी करणार असलेल्या मदत व बचावकार्यची माहिती देणार असल्याचे श्री पवार यांनी सांगितले.
                 गुरुवार 15 मार्च, 2018 रोजी महानगरपालिका सभागृहात, 16  मार्च 2018 रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात, 17 मार्च 2018 रोजी मंगलम सभागृह, जिल्हा पोलीस कवायात मैदान, जळगाव येथे, 19 मार्च 2018 रोजी हतनुर धरण, ता. भुसावळ येथे तर 20 मार्च 2018 रोजी जिल्हा नियोजन सभागृह, जळगांव येथे सकाळी 11 वाजता या सप्ताहाचा समारोप होणार आहे.
                 त्याचबरोबर धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या अधिकाऱ्यांनी आगामी उन्हाळा व मान्सुन कालावधीत उष्माघात, अतिवृष्टी, पुर, वज्राघात, वादळ, तसेच आकस्मीत लागणारी आग, वायुगळती, रस्ते अपघात, बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ले, भुकंप इ. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती दरम्यान शासकिय विभाग व नागरीकांनी घ्यावयाची दक्षता व उपाय. अशा आपत्कालीन परिस्थीतीत काय करावे व काय करु नये तसेच प्रथमोपचार, शोध, मदत व बचावकार्य, योग्य समन्वय इ. बाबतचे साहित्यांचे प्रात्य‍क्षिक, एलसीडीद्वारा माहितीपट दाखविण्यात आला.
                                                           000

No comments:

Post a Comment