Monday, 19 March 2018

50 कोटी वृक्ष लागवड मोहिम यशस्वीपणे राबविण्यासाठी आतापासून नियोजन करावे - जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर • जिल्ह्याला 42 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट







           जळगाव, दि. 19 - जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहिम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांना देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन आतापासून करावे. याकरीता वृक्ष लागवडीसाठी लागणारे खड्डे पावसाळयापूर्वीच खोदून त्यांचे जीओ टॅगींग करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज झालेल्या बैठकीत दिल्या.
         50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत यावर्षी राज्यात 13 कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या अतंर्गत जिल्ह्याला 42 लाख 47 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. के. दिवेकर, जळगाव विभागाचे उपवनसंरक्षक डी. डब्लू. पगार, यावल विभागाचे उपवनसंरक्षक संजय दहिवले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अधिक्षक प्रशांत सोनवणे,  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त खुशाल गायकवाड,  जलसंधारण विभागाचे कार्यकारी अधिकारी आर. आर. नंदनवार, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक साहेबराव पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक सुनील कुऱ्हाडे यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
         यंदाच्या वर्षी जिल्ह्याला 42 लाख 47 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना 12 लाख 56 हजार, जळगाव वन विभागास 6 लाख, यावल वन विभागास 13 लाख 73 हजार, सामाजिक वनीकरण विभागास 6 लाख तर इतर विभागांना 3 लाख 18 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यात 46 लाखापेक्षा अधिक रोपे तयार असल्याची माहिती श्री. पगार यांनी बैठकीत दिली. उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड करण्याचा निर्धार या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आतापासूनच नियोजन करावे अशा सुचना त्यांनी उपस्थितांना दिल्यात. त्याचबरोबर जिल्ह्यात हरित सेनेची सभासद नोंदणी वाढण्यासाठी सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी नोंदणी करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी केले.
000

No comments:

Post a Comment