Tuesday, 6 March 2018

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश अर्जासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ



       जळगाव, दि.6- आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गात प्रवेश देण्याची योजना राबविण्यात येत आहे. यासाठी प्रवेश अर्ज करण्यासाठी 31 मार्च, 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. अशी माहिती आर. बी. हिवाळे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांनी दिली आहे.
            या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. विद्यार्थ्याच्या किंवा पालकांचे नांवे सक्षम अधिका-याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकीत प्रत सादर करावी लागेल. दारिद्रय रेषेखालील असल्यास यादीतील अनुक्रमांक नमुद असलेला ग्रामसेवकाचा दाखला आवश्यक आहे. पालकाच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची  कमाल  मर्यादा एक लाख रुपये या मर्यादेत असावी. इयत्ता पहिली साठी प्रवेश घेणा-या विद्यार्थ्याचे वय 30 सप्टेंबर, 2018 रोजी 5 वर्षे 8 महिने पूर्ण असावे. त्याचा जन्म 1 जानेवारी, 2012 ते 30 जानेवारी, 2013 दरम्यान झालेला असावा.  इयत्ता दुसरीच्या वर्गात प्रवेशासाठी  विद्यार्थी सन 2017-18 मध्ये इयत्ता पहिलीमध्ये शाळेत प्रवेशित असल्यबाबतचे बोनाफाईड अर्जासोबत जोडावे. विद्यार्थ्यांचे आधारकार्ड आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, विद्यार्थ्याचे पालक शासकीय/ निमशासकीय नोकरदार नसावेत.
            या योजनेतंर्गत ज्या पालकांना आपल्या पाल्यास इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यांनी प्रवेश अर्जासाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जि.जळगाव येथे प्रत्यक्ष पाल्याचा जन्मदाखला व आधारकार्ड सांक्षाकित प्रत सादर केल्यानंतर प्रवेश अर्ज विनामुल्य मिळेल. प्रवेश अर्ज वाटप करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत असुन आत प्रवेश अर्ज 7 ते 25 मार्च, 2018 या कालावधीत वाटप केले जाणार आहे. परीपूर्ण अर्ज भरुन 31 मार्च, 2018 पूर्वी अर्ज सादर करावा. असे आवाहन  श्री. हिवाळे, प्रकल्प अधिकारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००

No comments:

Post a Comment