Thursday, 1 March 2018

जळगावात साजरी झाली अनोखी होळी कृषि विभाग व विक्रेत्यांनी केली बोगस बियाणांची प्रतिकात्मक होळी


           जळगाव, दि. 1 - होळी हा सण जसा आनंदाचा सण आहे. तसाच तो वाईट प्रवृत्ती नष्ट करण्याचाही सण आहे. या सणाचे औचित्य साधून येथील कृषि विभाग व कृषि विक्रेत्यांनी आज बी. जे. मार्केट येथे बोगस बियाण्यांची प्रतिकात्मक होळी  केली.
          जिल्ह्यात कापुस हे महत्वाचे नगदी पीक आहे. खान्देशातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कापूस पीकाची लागवड करतात. त्यामुळे या भागात काही बोगस बियाणे विक्रेते मोठ्या प्रमाणावर कापसाच्या बोगस बियाणांची विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा विक्रेत्यांविरोधात कृषि विभागाने वेळोवेळी कडक कारवाई केलीच आहे. परंतु शेतकऱ्यांनीही अशा प्रवृत्तीपासून दूर रहावे यासाठी त्यांच्यात जनजागृती व्हावी याकरीता आज होळी सणाचे औचित्य साधून बोगस बियाणांची प्रतिकात्मक होळी करुन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचा अनोखा उपक्रम राबविला आहे.
             गेल्या काही वर्षापासून विविध नावांनी इतर राज्यांमधून दलालांमार्फत गावोगावी घरपोच सेवा देवून बोगस बियाणांची विक्री करण्यात येते. ही बाब लक्षात घेवून कापसाचे बियाणे खरेदी करतांना शेतक-यांची फसवणूक होऊ नये. यासाठी कृषी विभागामार्फत वेळोवळी जनजागृती करण्याबरोबरच शेतक-यांनी दर्जेदार, शासन प्रमाणित अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच पक्क्या बिलासोबत मिळणारे बियाणे खरेदी करावे. बिलावरील व पाकीटावरील प्लॉट नंबर, अंतिम मुदत, पाकिट सील बंद असल्याची खात्री करुनच बियाणे विकत घ्यावे. असा सल्लाही कृषी विभागाकडून शेतक-यांना देण्यात आला आहे.
            यावेळी जिल्हा गुणवता नियंत्रण अधिकारी अमित पाटील, कृषी अधिकारी, पंचायत समिती, जळगाव डी. एम. शिंपी, जिल्हा सिडस पेस्टीसाईड फर्टिलायझर डिलर्स असो. चे जिल्हाध्यक्ष विनोद तराळ, महाराष्ट्र राज्य सिडस पेस्टीसाईड फर्टिलायझर डिलर्स असो चे उपाध्यक्ष कैलास मालू यांच्यासह प्रमोद पाटील, सुभाष अग्रवाल, शैलेश काबरा, किरण नेहते, संतोष पाटील, नरेद्र सोमाणी, राजेंद्र पाटील, मुणोद ब्रदर्स, योगेश  लोडाया यांचेसह जिल्ह्यातील बियाणे विक्रेते व कपंनी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. असे तंत्र अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. 
                                                                      000

No comments:

Post a Comment