Monday, 16 April 2018

गोरगावले बु. येथील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा आराखडा एक आठवड्यात सादर करा - अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर


·     

    सन 2017-18 मध्ये अनु.जाती, विजाभज, इमाव व विमाप्रच्या विद्यार्थ्यांना 71 कोटी रुपये शिष्यवृत्ती, शिक्षण व परिक्षा फीचे वाटप.

       जळगाव, दि. 16 - यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतंर्गत मौजे. गोरगावले बु. ता. चोपडा येथील 20 वैदू जातीच्या लाभार्थ्यांकरीता वसाहतीसाठी जिल्हाधिकारी यांनी जागा उपलब्ध करुन दिलेली आहे. या जागेवर लाभार्थ्यांना आवश्यक त्या पायाभूत सुविधांसह वसाहत बांधण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रकल्प आराखडा प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांनी एक आठवड्यात सादर करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी आज दिले.
            जिल्हा सामाजिक विकास शक्ती प्रदत्त समितीची सभा अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात संपन्न झाली. याप्रसंगी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त खुशाल गायकवाड, समिती सदस्य तथा जिल्हा सरकारी वकील ॲङ केतन ढाके,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पी. सी. शिरसाठ, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, कौशल्य विकास विभागाच्या सहायक संचालक श्रीमती अनिसा तडवी आदिंसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
            अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाच्यावतीने देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम, शिक्षण फी, परीक्षा फी त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी संबंधित महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांचे अर्ज तातडीने प्राप्त करुन घेण्यात आले आहे. सन 2016-17 मध्ये यासाठी 79 हजार 788 अर्जांची नोंद झाली होती. त्यापैकी 34 हजार 650 अर्ज निकाली काढण्यात आले आहे. तर सन 2017-18 मध्ये प्राप्त अर्जांपैकी 35 हजार 827 अर्ज निकाली काढण्यात आले आहे. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना 19 कोटी 21 लाख 47 हजार रुपयांचे तर इमाव, विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांना 51 कोटी 46 लाख 82 हजार रुपयांची शिष्यवृत्ती, शिक्षण व परिक्षा फीचे वाटप करण्यात  आले आहे. तसेच शासकीय वसतीगृह व निवासी शाळा आणि आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्यात आले आहे. तर अनिवासी आश्रमशाळेतील 150 प्रलंबित विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्याची कार्यवाही सुरु आहे. त्याचबरोबर शासकीय वसतीगृहातील व आश्रमशाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी पूर्ण झाल्याची माहितीही श्री. गायकवाड, सहायक आयुक्त यांनी बैठकीत दिली.       
         या बैठकीत शासकीय वसतीगृह, निवासी शाळा, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आधारकार्डचे वाटप, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, शिष्यवृत्ती वाटप, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, रमाई आवास योजना, अनुसूचित जाती उपयोजनांचा आढावा अपर जिल्हाधिकारी श्री. गाडीलकर यांनी घेतला.  
000

No comments:

Post a Comment