Friday, 8 December 2017

सार्वजनिक भागिदारी तत्वावर सधन कुक्कुट गट स्थापन करण्यासाठी 30 डिसेंबर पर्यंत अर्ज करावेत

            जळगाव दि. 8 :- सार्वजनिक भागिदारी तत्वावर सधन कुक्कुट गट स्थापन करणेसाठी जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातून दरवर्षी टप्प्याटप्याने अर्ज मागविण्यात येत आहे. जिल्ह्यात सन 2018-19 या वर्षाकरीता अमळनेर, भुसावळ, भडगाव, बोदवड या तालुक्यातील लाभार्थीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.  या तालुक्यातील ज्यांच्याकडे कुक्कुट पालनाचा व्यवसाय, स्वत:च्या मालकीची दोन हजार 500 चौ.फुट जागा, दळणवळणाची सोय, वीज पाण्याची सोय उपलब्ध असेल असे या योजनेसाठी पात्र असतील तसेच हॅचर सेंटर असेल त्यांना  प्रथम प्राधान्य दिले जाईल.    
             प्रत्येक वर्षी टप्याने अर्ज करण्यासाठी वर्षनिहाय तालुके पुढील प्रमाणे. सन 2018-2019 अमळनेर, भुसावळ, भडगाव, बोदवड तालुक्यातील एक लाभार्थी, सन  2019-2020 चाळीसगाव, एरंडोल, धरणगाव, जळगाव तालुक्यातील एक लाभार्थी, सन 2020-2021 जामनेर, मुक्ताईनगर, पारोळा, रावेर, यावल तालुक्यातील एक लाभार्थी निवडण्यात येणार आहे.
             पात्र व इच्छुक लाभार्थ्यांनी आपले अर्ज पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) किंवा जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांचेमार्फत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाकडे विहित नमुन्यात व परिपुर्ण कागदपत्रांसह दि. 30 डिसेंबर 2017 पर्यंत सादर करावेत. लाभार्थीची निवड जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीमार्फत होईल.
             शासन निर्णय व मार्गदर्शक सुचना महाराष्ट्र शासनाचे  www.maharashtra.gov.in या संकेतस्थळवर अथवा पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांचेकडे पहावयास मिळेल, असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                   00000

No comments:

Post a Comment