Thursday, 21 December 2017

सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायासाठी मुद्रा योजनेतून कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार - जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर






            जळगाव, दि. 21 - सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी रोजगार व स्वयंरोजगारासाठी व्यवसाय सुरु केल्यास त्यांना मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल. याबाबत जिल्हास्तरीय बँकांना तश्या सुचना देण्यात आल्या असल्याने विद्यार्थ्यांनी संबंधित बँकांशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर केले.
सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा. यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व महानगरपालिकेच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आज येथील बालगंधर्व खुले नाट्यगृहात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर बोलत होते.
            यावेळी महापौर ललित कोल्हे, उपायुक्त तथा शहर प्रकल्प अधिकारी लक्ष्मीकांत कहार, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक श्रीमती अनिसा तडवी, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी गायत्री पाटील, मनापाच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती प्रतिभा कापसे, आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात 15 विविध कंपन्यांना बोलविण्यात आले असून त्यांना आवश्यक असणाऱ्या कुशल कामगारांची निवड करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांची या मेळाव्यात निवड होणार नाही त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरु करावा. व्यवसायाच्या भांडवलासाठी मुद्रा योजनेतून कर्ज घेतांना विद्यार्थ्यांनी संवाद साधल्यास त्यांच्या अडचणी सोडविण्यात येतील. जळगावात चटई बनविणे, शिवणकाम, ब्युटीपार्लर यासारखे व्यवसाय सुरु आहेत. 23 डिसेंबर पासून विमानसेवा सुरु होत असल्याने पर्यटनासारखे व्यवसाय आता उपलब्ध होणार आहे. जळगावात केळी, वांगे यांचे चांगले उत्पादन होते त्याच्या मार्केटींगची  गरज ओळखून विद्यार्थ्यांनी व्यवसायाची निवड करावी असेही त्यांनी सांगितले.
            या मेळाव्यात आलेल्या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी त्यांना आवश्यक असलेल्या कुशल कामगारांसाठी असलेल्या पात्रतेबाबतची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणाबाबत आपले मनोगत व्यक्त केले. या मेळाव्यात उपस्थित असलेल्या महात्मा फुले विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोकार विकास महामंडळ आणि विशेष मागासवर्ग विकास महामंडळाच्या प्रतिनिधींनी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
            यावेळी ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण पुर्ण केलेल्या विद्यार्थीनींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे व्यवस्थापक भुषण बाळे यांनी केले तर आभार सहाय्यक प्रकल्प अधिकारी गायत्री पाटील यांनी मानले. या मेळाव्यास सुशिक्षीत बेरोजगार तरुण-तरुणी, 18 ते 25 वयोगटातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.                
000


       

No comments:

Post a Comment