Thursday, 30 November 2017

राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत टॅक्टरचे वितरण

     जळगाव दि. 30 - राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत टॅक्टरचे वितरण आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते विमलबाई गोविंदा चौधरी, ममुराबाद व सौ. कुमुद जगदिश चौधरी, रा. कडगाव यांना टॅक्टरचे वितरण करण्यात आले. याप्रंसगी कृषि उपसंचालक अनिल भोकरे, मंडळ कृषि अधिकारी एल. व्ही. तळेले, श्री. महाले, श्री. डी. डी. सोनवणे, श्री. बालाजी कोळी व शेतकरी उपस्थित होते.
                                                                      ०००००००

जिल्हास्तरीय बाल महोत्सवाचे बक्षिस वितरण संपन्न



         जळगाव, दि. 30 - बाल विकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय, स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांसाठी विविध खेळ, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या महोत्सवाचा बक्षिस वितरण समारंभ जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे श्री. राजेंद्र पाटील, बाल विकास प्रकल्प अधिकारी, चोपडा यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.         जिल्ह्यातील विविध बालगृहातील व शहरातील शाळांमधील विजेत्या मुला-मुलींना प्रथम, व्दितीय व तृतीय तसेच इतर मुला-मुलींना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. या कार्यक्रमास प्रविण पाटील, इक्बाल मिर्झा, दिपाली देवरे, आसिफ पठाण, अक्षय सोनवणे, राहुल पाटील, श्रीमती हर्षाली पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर, श्री. गजानन देशमुख, आरती साळुंखे तसेच शासकीय व स्वयंसेवी संस्थांचे अधिक्षक व कर्मचारी वृंद, कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. रमेश काटकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन परिवीक्षा अधिकारी श्रीमती जयश्री पाटील यांनी केले. तर आभारप्रदर्शन परिवीक्षा अधिकारी श्रीमती सारीका मेतकर पाटील यांनी केले.
            या कार्यक्रमासाठी जिल्हा परिवीक्षा अधिकारी एस.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संध्या वानखेडे, शोभा हंडोरे, विद्या सोनार, साजिद पठाण, डॉ. विजय पाटील यांचेसह कार्यालयातील श्री. प्रदिप ससाणे, श्री. संजय चव्हाण, श्री. नितीन विसपुते यांचे सहकार्य लाभले.
०००००

जिल्हास्तर क्रीडा पुरस्कार 2017 करीता 8 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन



       जळगाव, दि. 30 - क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे जिल्हयातील उत्कृष्ठ क्रीडापटू, उत्कृष्ठ दिव्यांग खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता यांच्या कार्याचे, योगदानाचे मुल्यमापन व्हावे. त्यांचा गौरव व्हावा होऊन क्रीडा क्षेत्रास प्रोत्साहन मिळावे. या उद्देशाने गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संघटक, कार्यकर्ता आणि गुणवंत खेळाडू या नावाने जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. सन 2017 च्या पुरस्कारासाठी  जिल्हा क्रीडा कार्यालय, जळगांव यांचेमार्फत 8 डिसेंबर 2017 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. अशी माहिती श्रीमती सुनंदा पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दिली आहे.
            या पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख दहा हजार रुपये असे आहे. या पुरस्कारासाठी 30 जून, 2017 पर्यंतची कामगिरी व कार्य ग्राहय धरले जाणार आहे. पुरस्काराकरीता 8 डिसेंबर 2017 पर्यंत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जदाराने प्रस्तावाची हार्ड कॉफी कार्यालयात 12 डिसेंबर 2017 जमा करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अधिक माहितीसाठी श्री. सजय महिरे, मो. नं. 8552858001, श्री. अमित मनोरे, मो. नं. 9175330285, सौ. रेखा पाटील, मो.नं. 9421693471 यांचेशी संपर्क साधावा. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी Jalgaonsports.in या वेब साईटवर जावून ऑनलाईन अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रे अपलोड करावे. त्यानंतर सर्व कागदपत्रासह अर्जाची हार्डप्रत जिल्हा क्रीडा कार्यालयात जमा करावी. असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००

जागतिक एड्स नियंत्रण दिनानिमित्ताने आजपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन



    
      

      जळगाव, दि. 30 - जागतिक एड्स नियंत्रण दिनानिमित्तोन जिल्ह्यात 1 ते 15 डिसेंबर पर्यंत जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक पथक, सामान्य रुग्णालय, जळगाव यांच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांचेसमवेत पथकाचे प्रमूख डॉ. संजय पहूरकर, डॉ. योगिता बावीस्कर आदि उपस्थित होते.
कौटुंबिक तपासणी - महाराष्ट्र राज्य एड्स नियत्रंण संस्थेमार्फत्‍ राज्यभर जागतिक एड्स नियंत्रण सप्ताहास साजरा करीत आहे. या मोहिमेमध्ये एचआयव्ही संसर्गित आढळलेल्या प्रत्येक रुग्णाला एआरटी सुरु करणे, एचआयव्ही संसर्गित आढळलेल्या प्रत्येक रुग्णाच्या कुटूंबातील सर्व व्यक्तींची एचआयव्ही तपासणी करणे, अतिजोखिम गटामध्ये असलेल्या लोकांची एचआयव्ही तपासणी करण्यात येणार आहे. एचआयव्ही संसर्गित व्यक्तीबद्दल समाजामध्ये असणारी भेदभावाची भावना बदलून त्यांना समानतेची वागणुक देणे. एचआयव्ही संसर्गित व्यक्तींना औपधोपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी या मोहिमेत विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे.  
एचआयव्हीसह जगणा-या व्यक्तींकरिता विविध स्पर्धा - 10 ते 18 नोव्हेंबर 2017 दरम्यान एचआयव्ही संसर्गित व्यक्तीकरिता, चित्रकला व घोषवाक्य स्पर्धा, आत्मलेख इत्यादी स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये एकूण 30 व्यक्तींनी सहभाग नोंदवुन त्यामधून चित्रकला व घोषवाक्य स्पर्धेतील उत्कृष्ठ विजेते निवडणे.
एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींकरिता वधुवर परिचय मेळावा - सुरत येथे एचआयव्हीसह जीवन जगणा-या रुग्णांसाठी 1 डिसेंबर 2017 रोजी राज्यस्तरीय वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. याकरिता 11 ते 25 नोव्हेंबर 2017 दरम्यान वधुवर परिचय मेळाव्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले होते. या मेळाव्यास जळगाव जिल्हयातून 7 विवाह इच्छुकांनी अर्ज सादर केलेले आहेत.
पोस्टर प्रदर्शन, पथनाट्य, प्रभातफेरी -             जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभागातर्फे एचआयव्ही, एड्स व जागतिक एड्स नियंत्रण दिनाविषयी पोस्टर प्रदर्शन, प्रभातफेरी व पथनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन 1 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 8.30 वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या प्रभात फेरीमध्ये माध्यमिक शाळातील, महाविद्यालयातील विद्यार्थी, आरोग्य विभाग, शासनाच्या विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, सेवाभावी संस्था सहभागी होणार आहे. ही प्रभातफेरीचा सामान्य रुग्णालय जळगाव येथून निघुन बेंडाळे चौक - चित्रा चौक - शिवाजी चौक - नविन बस स्टॅन्ड - स्वातंत्र चौक मार्ग सामान्य रुग्णालय असा मार्ग आहे. तालुकास्तरावर चोपडा, अमळनेर, जामनेर, धरणगाव, पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयातील आयसीटीसी केंद्रामार्फत प्रभातफेरी व पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच 2 व 3 डिसेंबर 2017 रोजी जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभाग, सामान्य रुग्णालय, जळगाव यांचेवतीने जळगाव नवीन बसस्थानक व रेल्वे स्थानक, जळगाव च्या आवारामध्ये पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये एचआयव्ही, एड्सबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तर 2 डिसेंबर 2017 रोजी अमळनेर येथे दुपारी 3 वाजता विप्रो कंपनीमध्ये एचआयव्ही, एड्सबाबत जनजागृती पर लघुपट व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
            तसेच देहविक्री करणा-या महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेमार्फत अनुदानित अशासकीय संस्थेच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
भगिणी मेळावा - 9 डिसेंबर, 2017 रोजी दुपारी 4 वाजता संगीत सभागृह, भास्कर मार्केट, जळगाव येथे पोस्टर प्रदर्शन, व्याख्याने, लघुपट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर 12 डिसेंबर 2017 रोजी जिल्हा उद्योग केंद्र, भुसावळ येथे दुपारी 2 वाजता गोदावरी संस्था, जळगाव यांचेतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तसेच आधार संस्था, अमळनेरतर्फे 1 ते 15 डिसेंबर 2017 दरम्यान अमळनेर, पाचोरा, चोपडा तालुक्यातील भगिनींकरिता भगिनी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
रेड रिबिन क्लब - 1 डिसेंबर, 2017 जागतिक एड्स नियंत्रण दिन व सप्ताहाच्या निमित्ताने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातंर्गत असलेल्या सर्व एनएसएस युनिट व रेड रिबिन क्लब तर्फे महाविद्यालयामध्ये 5 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत हिवाळी शिबीरांमध्ये प्रत्येक गावामध्ये एचआयव्ही, एड्स जनजागृतीवर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
शासकीय योजनांच्या माहितीचा मेळावा - एचआयव्हीसह जीवन जगणा-या लोकांकरिता जागतिक एड्स दिन व सप्ताहाच्या निमित्ताने 21 डिसेंबर, 2017 रोजी दुपारी 2 वाजता शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्याबाबतचा कार्यक्रम एआरटी केंद्र, सामान्य रुग्णालय, जळगाव येथे आयोजित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व आयसीटीसी केंद्राव्दारे अतिजोखिम गटातील व्यक्तींकरीता तसेच महाविद्यालयीन युवक, युवतीकरिता एचआयव्ही, एड्स विषयक जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. संजय पहूरकर यांनी यावेळी दिली.
ट्रक चालक व वाहक तसेच निगडीत कर्मचारी यांचा मेळावा - 1 ते 15 डिसेंबर दरम्यान ट्रान्सपोर्टनगर व शहराच्या आत येणाऱ्या नाक्यांवर पोस्टर प्रदर्शन, माहितीपत्रके वाटप करणे व व्याख्याने देऊन परिवहन विभागाच्या सहकार्याने ट्रक चालक व वाहक यांचेमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
            एचआयव्ही संसर्गित व्यक्तींनी या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 0 0

नरभक्षक बिबट्यास पकडण्यासाठी वन विभागाकडून कसोशीचे प्रयत्न सुरु - सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील

         चाळीसगाव, दि. 30 :- तालुक्यातील वरखेडे येथील नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वा ठार मारण्यासाठी वनविभागाच्या वतीने कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे. लवकरच बिबटया जेरबंद करण्यात येईल अशी माहिती राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
         तालुक्यातील वरखेडे येथे नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेते ते बोलत होते.  या पत्रकार परिषदेस जळगावचे उप वनसंरक्षक एम. आदर्शकुमार रेड्डी, चाळीसगावचे उपविभागीय अधिकारी शरद पवार, तहसिलदार कैलास देवरे, विविध स्थानिक वृत्तपत्रांचे संपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, वाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
       श्री. पाटील पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना शेतात काम करता यावे यासाठी दिवसा होणारे लोडशेडींग बंद करण्यात आले आहे. बिबट्या पकडण्यासाठी पिंजऱ्यात ठेवलेल्या बकऱ्या पिंजऱ्यात न ठेवता त्या बिबट्या ज्या भागात असण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी ठेवाव्यात. जेणेकरुन बिबटयाचा माग काढणे सोपे होईल  असे विविध उपाय  त्यांनी सुचविले. विविध कारणांमुळे शेतकरी संकटात असताना आत बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतातील माल काढून बाजारात विकता येत नाही यामुळे शेतकरी अडचणीत आहे. बिबट्याच्या उपद्रवापासून नागरीकांची लवकर मुक्तता होण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबतही त्यांनी वनविभागाला सुचना दिल्यात.
          तत्पूर्वी वरखेडे येथील दीपाली नारायण जगताप, सुशाबाई धना माळी (भिल), यमुनाबाई बापदला तिरमली या महिला बिबट्याच्या हल्यात मृत्यु पावल्याने राज्यमंत्री गुलाबराव पाटील  यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटंबियांचे सात्वंन केले. बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींचे प्राण आपण परत आणू शकत नाही. परंतू त्यांच्या कुटुंबियांना शक्य ती मदत शासनाकडून देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
000

भुसावळ शहरातील 24 रेशन दुकानांवर जीवनावश्यक वस्तु अधिनियमान्वये फौजदारी कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे संकेत

        जळगाव, दि. 30 - भुसावळ शहरातील एकूण 57 स्वस्त धान्य दुकानांची जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज अचानक तपासणी करण्यात आली. या तपासणीसाठी 27 विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. या विशेष पथकात 7 उपजिल्हाधिकारी, 20 तहसिलदार यांचा समावेश होता.
         या तपासणी मोहिमेमध्ये 10 स्वस्त धान्य दुकाने बंद आढळून आली, इतर रेशन दुकानांमध्ये रेशन कार्डाबाबतची माहीत अद्यावत नसणे. ई पॉझ मशीनव्दारे 100 टक्के धान्य वाटप न करणे, अभिलेख अद्यावत न ठेवणे, पुस्तकी साठा आणि प्रत्यक्ष साठा यांच्यात तफावत असणे. अशाप्रकारचे गंभीर दोष आढळून आले. एकूण 57 दुकानांपैकी 24 दुकाने अकार्यान्वित असल्याचेही दिसून आले असून ही दुकाने ठरावीक व्यक्तीनाच जोडलेली असल्याचेही निदर्शनास आल्याने त्यांचेवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमातील कलम 3 व 7 नुसार फौजदारी कारवाई करण्याचे संकेतही जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी दिले आहेत.
                                                              ०००००

जिल्हास्तर व राज्यस्तर युवा पुरस्कार 2017 करीता 8 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

        जळगाव, दि. 30 – राज्यातील व जिल्ह्यातील युवांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा. युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासनामार्फत एक युवक, एक युवती व एक नोंदणीकृत संस्था यांना राज्य व जिल्हास्तरावर युवा पुरस्कार देण्यात येतो. सन 2017-18 या वर्षापासून जिल्हास्तर व राज्यस्तर युवा पुरस्कारांकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 डिसेंबर 2017 पर्यंत आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी दिली आहे.
      अर्जदाराने प्रस्तावाची हार्ड कॉफी कार्यालयात 12 डिसेंबर 2017 पर्यंत जमा करावी. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी Jalgaonsports.in या वेबसाईटचा उपयोग करावा. ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अधिक माहितीसाठी श्री. सजय महिरे, मो.नं. 8552858001, श्री. अमित मनोरे मो. नं. 9175330285, सौ. रेखा पाटील, मो.नं. 9421693471 यांचेशी संपर्क साधावा.
      जिल्हा व राज्य पुरस्काराकरिता अर्जदार युवक, युवतीचे वय पुरस्कार वर्षातील 1 एप्रिल रोजी 13 वर्ष पूर्ण व 31 मार्च रोजी 35 वर्षापर्यंत असावे. या पुरस्कारांसाठी अर्ज करणा-या युवक,युवती व युवा विकासाचे कार्य करणा-या संस्थांनी 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत गत तीन वर्षाची केलेली कामगिरी विचारात घेतली जाईल.
     विहीत नमुन्यातील अर्ज, पुरस्काराच्या अटी व शर्ती व इतर माहितीसाठी इच्छुकांनी व्यक्तीश: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ए. विंग, श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, स्टेटबँक ऑफ इंडिया समोर, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे जिल्हा क्रीडा अधिकारी, सुनंदा पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                      ०००००

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरीता अर्ज करण्यास 9 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

          जळगाव, दि. 30 :- शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरीता ऑनलाईन प्रणालीव्दारे अर्ज करण्याची मुदत 9 डिसेंबर 2017 पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, पुणे यांनी दिली आहे.
          तसेच अर्जासोबत 100 प्रमाणपत्राची मर्यादा रद्द करुन अर्जदाराने सादर केलेल्या सर्व attachment upload करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. तरी सन 2014-15 ते 2016-17 या तीन वर्षातील पुरस्कारांसाठी अर्ज करावेत. असे आवाहन उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
                                                                  ०००००

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ११ डिसेंबर रोजी

       जळगाव दि. 30 :- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दिनांक 11 डिसेंबर, 2017 रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली आहे.
     जनतेची गाऱ्हाणी व तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. या महिन्यातील लोकशाही दिन पहिला सोमवार 4 डिसेंबर ऐवजी ( काही अपरिहार्य कारणास्तव सदरचा लोकशाही दिन रद्द करुन ) 11 डिसेंबर 2017 रोजी दुपारी तीन वाजता आयोजित केला आहे. झालेल्या बदलाची नोंद नागरीकांनी घ्यावी तसेच या लोकशाही दिनी नागरिकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरुपात आणाव्यात. असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले आहे.                
                                                             ०००००

अनुसुचित क्षेत्रातील महिला सरपंच पदाचे आरक्षण जाहिर 28 पैकी 14 ग्रामपंचायतीवर येणार महिला राज

 
     जळगाव, दि. 30 - जिल्ह्यातील यावल, चोपडा, रावेर तालुक्यातील अनुसुचित क्षेत्रातील 28 ग्रामपंचायतीपैकी महिलांकरीता सरपंच पद आरक्षित करावयाच्या ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी (महसुल) अभिजीत भांडे पाटील यांचे उपस्थितीत काढण्यात आली.
     रावेर तालुक्यातील 13 पैकी 7 ग्रामपंचायती महिला सरपंच पदासाठी आरक्षित झाल्या असून यामध्ये पाल, जिन्सी, पिंप्री, जानेारी, मोहमांडली, लोहारे, पाडळे बु. या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर चोपडा तालुक्यातील 11 पैकी 6 ग्रामपंचायती महिला सरपंच पदासाठी आरक्षित झाल्या असून यामध्ये कर्जाणे, मोहरद, मेलाणे, बोरअजंती, कृष्णापूर, देव्हारी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तसेच यावल तालुक्यातील 4 पैकी 2 ग्रामपंचायती महिला सरपंच पदासाठी आरक्षित झाल्या असून यामध्ये गाडऱ्या व मालोद या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
     या आरक्षण सोडतीच्या चिठ्ठया जळगाव येथील प्रगती गजानन जेऊघाले हिच्या हस्ते काढण्यात आल्या.
                                                                           ०००००

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा

            जळगाव, दि. 30 :- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा शुक्रवार 01 डिसेंबर 2017 रोजीचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
            शुक्रवार 1 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10.00 ते दुपारी 01.00 वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 3.00 वा. जळगावकडे प्रयाण. दुपारी 3 वा. 30 मि.नी. जळगाव येथे आशा दिवस सोहळा कार्यक्रमांस उपस्थिती. (स्थळ:- रोटरी भवन मायादेवी नगर,जळगाव), सायं. 5.00 वा. जळगाव येथे राज्यस्तरीय तरवारबाजी स्पर्धाचे उदघाटन कार्यक्रमांस उपस्थिती. (स्थळ :- छत्रपत्री शिवाजी महाराज क्रिडा संकुल, जळगाव) सायं. 6.00 वाजता सोईनुसार पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
०००००