Thursday, 23 November 2017

तपासणी मोहिमेत बंद आढळलेल्या शहरातील 31 स्वस्त धान्य दुकानांना पुरवठा विभागाच्या नोटीसा



            जळगांव, दि. 23 - तपासणी मोहिमेत बंद आढळलेल्या शहरातील 31 स्वस्त धान्य दुकानांना त्यांची अनामत रक्कम जमा करणे, परवाना निलंबीत अथवा रद्द करणे अगर फौजदारी स्वरुपाची कारवाई का करण्यात येवू नये. अशाप्रकारच्या नोटीसा देण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव, यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.
            जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या आदेशान्वये जळगाव शहरातील स्वस्त धान्य दुकानांच्या  तपासाणीसाठी पुरवठा विभागातर्फे 21 नोव्हेंबर रोजी शहरात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत  जिल्हाधिकारी कार्यालय व पुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचे एकूण 27 पथकांची नेमणुक करण्यात आली होती. या पथकांनी शहरातील एकूण 107 स्वस्त धान्य दुकानांची तपासणी केली. त्यापैकी 31 स्वस्त धान्य दुकाने बंद आढळून आली.
       तपासणी मोहिमेत बंद आढळून आलेल्या स्वस्त धान्य दुकानदारांनी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या 2 मे 2003 च्या आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येवून महाराष्ट्र अनुसूचित वस्तु वितरणाचे विनियमन आदेश 1975 मधील खंड 3 (2) प्रमाणे स्वस्त धान्य दुकानापोटी भरलेली अनामत रक्कम सरकार जमा करण्यात येवून स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र निलंबीत अथवा रद्द का करण्यात येवु नये याबाबत नोटीसा देण्यात आल्या असून त्याचा खुलासा करण्यास कळविण्यात आलेले आहे.
            त्याचबरोबर उर्वरित 76 स्वस्त धान्य दुकानांचे तपासणीत आढळून आलेल्या दोषांबाबत पडताळणी करण्यात येवून पुढील कार्यवाही महाराष्ट्र अनुसूचित वस्तु वितरणाचे विनियमन आदेश 1975 मध्ये दिलेल्या तरतुदीप्रमाणे अनामत रक्कम जमा, निलंबीत अथवा रद्द अगर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येईल. असे जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.
०००००

No comments:

Post a Comment