Friday, 24 November 2017

‘कृषि जल्लोष’ चे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन कृषी विभागामार्फत आयोजित क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवास सुरुवात







     जळगाव, दिनांक 24 :-  कृषि विभागामार्फत कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा. कार्यालयीन कामकाजामध्ये खेळीमेळीचे वातावरण निर्माण होवुन एकमेकांशी स्नेहसंबंध जोपासले जावा. या हेतुने आयोजित करण्यात आलेल्या कृषि जल्लोष या तीन दिवशीय जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे येथील पोलीस कवायत मैदानावर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर उप वनसंरक्षक आदर्शकुमार रेड्डी, पोलीस उप अधिक्षक (मुख्यालय) रशीद तडवी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी, मधुकर चौधरी, महाराष्ट्र बॅंकेचे अधिकारी श्री. किणीकर, फारुक शेख यांचेसह एलआयसी व कृषि संबंधित विविध कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.
     उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर म्हणाले की, कृषि विभाग शेती आणि शेतकऱ्यांशी निगडीत विभाग असल्याने या विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना विविध उपक्रमांच्या निमित्ताने शेताच्या बांधावर जाऊन काम करावे लागते. क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडूवृत्ती जोपासली जाते. तर सांस्कृतिक कार्यक्रमातून कलागुणांना वाव मिळत असल्याने अशा महोत्सवामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना तणावमुक्त वातावरणात कार्यालयीन कामकाज करण्यास मदत होणार असल्याने त्यांनी आयोजकांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
     यावेळी जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलीत करुन या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालय, जळगाव व तालुका कृषि कार्यालय, जामनेर यांच्यातील क्रिकेट सामन्याचा टॉस करण्यात आला. यावेळी उप वनसंरक्षक श्री. रेड्डी यांनी फलंदाजी करुन तर जिल्हाधिकारी यांनी गोलंदाजी करुन सामन्यास सुरुवात करण्यात आली.
     कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. सोनवणे यांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात क्रीडा समितीचे अध्यक्ष तथा कृषि उपसंचालक श्री. अनिल भोकरे यांनी या महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली.
    या तीन दिवशीय (24 ते 26 नोव्हें.) महोत्सवात क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. यामध्ये  किक्रेट, बॅटमिंटन, व्हॉलीबॉल, कबड्डी, जलतरण, रस्सीखेच, 100 मीटर धावणे, 200 व 400 मीटर चालणे, कॅरम, टेबल टेनिस, बुध्दीबळ आदी खेळांचा समावेश आहे. तर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नृत्य, गायन, वादन, नाटक, एकांकीका व मिमिक्री आदी कार्यक्रम होणार आहे. क्रीडा स्पर्धा 24 व 25 नोव्हेंबर रोजी पोलीस कवायत मैदानावर होणार आहे. तर 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ तर सांयकाळी 5 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम कांताई सभागृहात होणार आहे.
     या महोत्सवात कृषि विभागाच्या सर्व तालुका कार्यालयांचे संघ, तसेच वैयक्तिक स्पर्धांमध्ये अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. कार्यक्रमास कृषि विभागाचे जिल्ह्यातील सर्व उप विभागीय व तालुका कृषि अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार समितीचे सचिव प्रविण आवटे यांनी मानले.
                                                            0 0 0 0

No comments:

Post a Comment