Tuesday, 28 November 2017

नरभक्षक बिबट्यास ठार मारणे अथवा जेरबंद करण्यासाठी प्रशासन सज्ज



·         नरभक्षक बिबट्यास ठार मारणे अथवा जेरबंद करण्यासाठी जळगाव, अमरावती, बुलढाणा, नाशिक येथील वनविभागाच्या बेशुध्द करणाऱ्या 5 पथकांची नियुक्ती.
·         बिबट्यास मारणेसाठी वन विभागातील 10 व पोलिस विभागातील 10 शार्प शुटरची नियुक्ती.
·         वन विभागातील वनक्षेत्रपाल, वनपाल व वनरक्षक मिळून सुमारे 122 वन अधिकारी, कर्मचारी नियुक्त.
·         बिबट्यास जेरबंद करण्यासाठी बाधित क्षेत्रात 7 पिंजरे लावण्यात आले.
·         अतिरिक्त 5 पिंजरे लावण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
·         बिबट्याच्या हालचाली पाहण्यासाठी 10 ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले.
·         याशिवाय अजून 10 ट्रॅप कॅमेरे लावण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
·         बिबट्यास ठार मारण्याची परवानगी प्राप्त.
·         वन अधिकारी, कर्मचाऱ्यांना बिबट्याचा शोध घेण्यासाठी बाधित गावातील लोकप्रतिनिधी व तरुणांनी सक्रीय मदत करण्याचे आवाहन.
        जळगाव, दि. 28 - चाळीसगांव वनक्षेत्रातील नरभक्षक बिबट्यास प्रधान मुख्य वनसंरक्षक व वनबल प्रमुख, नागपूर यांच्या कार्यालयाकडून ठार मारण्याची परवानगी मिळाली आहे. या बिबट्यास ठार मारणे अथवा जेरबंद करण्यासाठी जळगाव, अमरावती, बुलढाणा, नाशिक येथील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच बिबट्यास बेशुध्द करणारी 5 पथके बाधित क्षेत्रात नियुक्त करण्यात आलेली आहेत. वन विभागातील 10 व पोलिस विभागातील 10 शार्प शुटरची बिबट्यास ठार मारणेकामी नियुक्ती करण्यात आलेली आहेत.  त्याचबरोबर वनविभागातील वनक्षेत्रपाल, वनपाल व वनरक्षक मिळून सुमारे 122 वन अधिकारी, कर्मचारी पायी चालून बिबट्याचा शोध घेत आहेत. या बिबट्यास जेरबंद करण्यासाठी बाधित क्षेत्रात 7 पिंजरे लावण्यात आलेले आहेत. तर अजून अतिरिक्त 5 पिंजरे लावण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. बिबट्याच्या हालचाली पाहण्यासाठी 10 ट्रॅप कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. याशिवाय  अजून 10 ट्रॅप कॅमेरे लावण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. वन अधिकारी, कर्मचारी यांना बिबट्याचा शोध घेण्यासाठी बाधित गावातील लोकप्रतिनिधी व तरुणांनी सक्रीय मदत करावी. असे आवाहन जळगाव वनविभागाचे उप वनसंरक्षक आदर्शकुमार रेड्डी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
            जिल्ह्यातील चाळीसगाव वनक्षेत्रातील सायगाव, देशमुखवाडी, वरखेडे बु, वरखेडे खु परिसरात मागील 15 दिवसात बिबटयाच्या हल्ल्‍यात चार जणांचा मृत्यु झालेला आहे. वनविभागाकडून उपद्रव देणा-या बिबट्यास जेरबंद करण्यासाठी ठिकठिकाणी पिंजरे तसेच ट्रॅप कॅमेरा लावून रेस्क्यू पथकासह गस्त करण्यात येत होती. गावांमध्ये जावून ग्रामस्थांनी काळजी घेणेबाबत दवंडी पिटून, माहिती पत्रकाचे वाटप करुन जनजागृती करण्यात आलेली आहे. ग्रामस्थ, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच महसूल व पोलिस यंत्रणेच्या सहकार्याने नियमितपणे बिबट्यास जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरु होते.
            26 नोंव्हेबर रोजी मौजे वरखेडे बु, येथे एका महिलेवर बिबट्याने हल्ला करुन ठार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर बिबट्यास जेरबंद करुन बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग, पोलिस विभाग, महसूल विभाग तसेच स्थानिक यंत्रणा व स्थानिक आमदार तसेच ग्रामस्थ यांच्यासह चाळीसगाव येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहावर दिनांक 27 नोव्हेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, मुख्य वनसरंक्षक धुळे, उप वनसंरक्षक, जळगाव आदर्शकुमार रेड्डी, अतिरिक्त पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, प्रातांधिकारी, तहसीलदार व इतर अधिकारी तसेच वरखेडे येथील सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
            या बैठकीमध्ये सर्वांनी बिबट्यास त्वरीत ठार मारण्याची मागणी केली गेली. त्यानुसार जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांचेशी संपर्क साधून बिबट्यास मारण्याची त्वरीत परवानगी मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केले. त्याप्रमाणे उप वनसंरक्षक, जळगाव यांचेमार्फत परवानगी मिळणेबाबत प्रधान मुख्य वनसंरक्षक व वनबल प्रमुख, नागपूर कार्यालयात पाठपुरावाही करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या 27 नोव्हेंबर रोजी या बिबट्यास ठार मारण्याची परवानगी प्राप्त झाली आहे. या नरभक्षक बिबट्यास ठार मारणे अथवा जेरबंद करण्यासाठी प्रशासनातर्फे सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचे आदर्शकुमार रेड्डी, उपवनसंरक्षक, वनविभाग जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
000

No comments:

Post a Comment