गोवर- रुबेला मोहिमेच्या पार्श्वभूमीवर
जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात
आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर हे बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, उप वनसंरक्षक
दिगंबर पगार, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा परिषदेच्या जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. बबीता कमलापूरकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जयकर,
महिला व बालविकास अधिकारी सरस्वती बागूल यांचेसह जिल्ह्यातील नगरपालिकांचे
मुख्याधिकारी, विविध स्वयंसेवी संस्था, संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर म्हणाले,
देशातून देवी व पोलिओ हे आजार लसीकरण अभियानाच्या प्रभावीपणे केलेल्या अंमलबजावणीमुळे
हद्दपार झाले आहेत. आता गोवर हा आजार हद्दपार करण्यासाठी आणि रुबेला आजाराच्या
नियंत्रणासाठी लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. मिझेल्स अर्थात गोवर व
रुबेलामुळे उदभवणाऱ्या जन्मजात आजारांचे देशातून 2020 पर्यंत समूळ निर्मूलनासाठी
राज्यात ही मोहीम राबविण्यात येईल. नऊ महिने ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना
मिझेल्स- रुबेला लस देण्यात येईल.
गोवर- रुबेला लसीकरण मोहीम हा अत्यंत महत्वाकांक्षी असा
उपक्रम आहे. आतापर्यंत देशातील 10 कोटी बालकांना ही लस देण्यात आली आहे.
लसीकरणाच्या वेळी वापरण्यात येणारी सीरिंज ही अत्यंत सुरक्षित अशी आहे. ती
प्रत्येक मुलासाठी वेगळी वापरण्यात येणार आहे. प्रत्येक विभागाने या मोहिमेची
प्रत्येक गावापर्यंत जनजागृती करावी.
या मोहिमेत शिक्षण विभागाची भूमिका
महत्वाची आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने शाळा- शाळांमध्ये पालक- शिक्षक संघाची बैठक
आयोजित करुन लसीकरणाची शास्त्रीय माहिती पालकांना द्यावी. तसेच सर्व शाळांच्या
मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करुन या मोहिमेस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन
करावे. या मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करताना एका शाळेत एकाच दिवशी ही मोहिम पूर्ण
करण्यात यावी. यासाठी खाजगी वैद्यकीय
अधिकारी यांचे सहकार्य घ्यावे. ही मोहीम राबविताना एकही पात्र लाभार्थी वंचित
राहणार नाही, अशी दक्षता घ्यावी. तसेच गोवर- रुबेला लसीकरण मोहिमेच्या
जनजागृतीसाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, व स्वयंसेवी संस्थाचे सहकार्य घ्यावे,
असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी दिले. या मोहिमेस जिल्हा
परिषदेच्या आरोग्य व शिक्षण विभागाच्यावतीने सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल अशी
ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिवेकर यांनी यावेळी दिली.
शाळेत लसीकरण करताना वैद्यकीय अधिकारी,
बालरोग तज्ज्ञ उपस्थित राहतील. लसीकरण केल्यावर अर्धा तास मुलाला देखरेखीखाली
ठेवण्यात येईल. त्यासाठी वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ज्ञांच्या संघटनेचे सहकार्य
घेण्यात येईल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलापूरकर
म्हणाल्या, गोवर हा विषाणूद्वारे पसरणारा आजार आहे. गोवरमुळे बालकांमध्ये गुंतागूंत
होवून एखाद्यावेळेस बालकाचा अकाली मृत्यू होवू शकतो. गोवर संसर्गजन्य रोग आहे.
संसर्ग झालेल्या व्यक्तीचे खोकणे आणि शिंकण्यातून तो अन्यत्र पसरतो. चेहऱ्यावर,
अंगावर उठलेले गुलाबी- लालसर पुरळ, ताप, खोकला, वाहणारे नाक आणि लालसर डोळे ही
गोवरची लक्षणे आहेत. गोवर- रुबेला लसीकरण हे या दोन्ही रोगांपासून संरक्षण करते.
त्यामुळे 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील प्रत्येक मुला- मुलीस ही लस टोचून घेणे
आवश्यक आहे. या मोहिमेंतर्गत देण्यात येणारी एमआर लस पूर्णपणे सुरक्षित आणि
प्रभावी आहे. तसेच ही लस गेल्या 40 वर्षांत जगातील अनेक देशात वापरली जात आहे.
जगातील 149 देशात एमआर/एमएमआर ही लस वापरली जात आहे, असेही डॉ. कमलापूरकर यांनी
सांगितले. यावेळी आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती
देण्यात आली.
000
No comments:
Post a Comment