जळगाव,
दि. 18 - माहिती व जनसंपर्क
महासंचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकराज्य वाचक अभियान’ अतंर्गत जळगाव तालुक्यातील पुनर्वसीत रायपूर
येथील जिल्हा परिषद मराठी शाळा ‘लोकराज्य शाळा’ करण्याचा संकल्प आज शाळेचे
मुख्याध्यापक मिलींद कोल्हे व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी केला.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा
माहिती कार्यालय, जळगावच्यावतीने जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात ‘लोकराज्य वाचक
अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा भाग म्हणून आज रायपूर येथील शाळेत वाचक
मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, शाळेचे
मुख्याध्यापक मिलींद कोल्हे, ज्येष्ट पत्रकार श्री. विजय पाठक, पत्रकार राजेंद्र
पाटील, रायपूरचे पोलीस पाटील रामसिंग परदेशी आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके
यांनी ‘लोकराज्य वाचक अभियान’ संदर्भात माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की,
लोकराज्य मासिकाला मोठी परंपरा असून महाराष्ट्र शासनाचे ते मुख्यपत्र आहे.
समाजातील चांगले काम आणि शासनाच्या कल्याणकारी योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्याचे
महत्वाचे काम लोकराज्य मासिकाच्या माध्यमातून होत आहे. महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र
असणारे लोकराज्य मासिक घरोघरी पोहोचविण्याचा संकल्प असल्याने आहे. शाळेतील जास्तीत
जास्त विद्यार्थ्यांनी वाचनाकडे लक्ष देवून आदर्श विद्यार्थी बनावे व आपल्या हातून
देशसेवा घडावी अशी अपेक्षाही व्यक्त केली.
आदर्श शाळा
खासगी
शाळांची वाढती संख्या व पालक-विद्यार्थ्याचा खासगी शाळांकडे असणारा ओढा लक्षात
घेता जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. मात्र रायपूर जिल्हा परिषदेची
शाळेची विद्यार्थी पटसंख्या बघून जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी शिक्षक
वृंदांसह पालकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शाळेचा स्वच्छ परिसर, रंगरंगोटी,
भींतींवरील बोधक अश्या चित्रकृती, विद्यार्थ्यांची शिस्त बघून श्री. बोडके यांनी
शिक्षकांचेही कौतुक केले.
ज्येष्ठ पत्रकार श्री. पाठक यांनी
विद्यार्थ्यांमध्ये रममाण होवून लोकराज्य मासिकाबद्दल व वाचनाचे महत्व
विद्यार्थ्यांना पटवून दिले. जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास, ध्येय,
वैचारिकता आणि त्याला भावनेची जोड देणे आवश्यक आहे. कुठलीही लढाई ही आत्मविश्वासाच्या
जोरावर जिंकता येते. लोकराज्य मासिकात असलेली संपूर्ण माहिती घरातील सर्व
परिवाराला उपयुक्त अशी आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी पालकांना त्याचे महत्व सांगून
लोकराज्य मासिकाचे वार्षीक वर्गणीदार व्हायला सांगण्याचे आवाहन श्री. पाठक यांनी
केले. यावेळी पत्रकार राजेंद्र पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या
सुरूवातीला मुख्याध्यापक मिलींद कोल्हे यांनी जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके
यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तर जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांनी
मुख्याध्यापक श्री.कोल्हे यांचा लोकराज्यचा अंक देवून सत्कार केला.
लोकराज्य
स्टॉलला प्रतिसाद
या कार्यक्रमा दरम्यान लोकराज्य
मासिकाचा स्टॉल लावण्यात आला होता. यास शिक्षकांसह विद्यार्थी व पालकांनी सक्रीय
सहभाग देवून लोकराज्य मासिकाचे संग्रहीत अंकांचे वाचन केले.
आभार पदवीधर शिक्षक अरूण रामदास सोनवणे
यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक मिलींद रामकृष्ण कोल्हे, पदवीधर
शिक्षीका छाया चतरसिंग राजपूत, छाया
निळकंठ चौधरी, कुंदा भगवान कोळंबे, निर्मला पांडुरंग विधाते, शंकर पांडूरंग
विधाते, चित्रलेखा किशोर वायकोळे, कल्पना भिमसिंग पाटील, मनीषा नरेंद्र जावळे,
जगदीश साहेबराव जाधव, वर्षा शाम ठाकरे, भारती देविदास शिंपी, क्रिडा निर्देशक पुनम
विजयसिंग परदेशी, कला निर्देशक छाया हिंमतराव पाटील यांनी परिश्रम घेतले.
बी. यू. एन. रायसोनी शाळेत लोकराज्य
वाचक मेळावा
जळगाव
शहरातील अयोध्यानगर भागात असलेल्या बी. यू. एन. रायसोनी शाळेत जिल्हा महिती
कार्यालय, जळगावतर्फे लोकराज्य वाचक मेळावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा माहिती
अधिकारी विलास बोडके यांनी शाळेचे अध्यक्ष श्री. शिरीष रायसोनी, इंग्रजी माध्यमाच्या
मुख्याध्यापिका सौ. नलीनी शर्मा, मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक श्री. चंद्रशेखर
पाटील यांना लोकराज्य मासिकाचा वारी विशेषांक भेट देवून सत्कार केला. तर शाळेच्या
वतीने मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील यांनी जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके
यांचा सत्कार केला.
यावेळी
जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून लोकराज्य
मासिकाबद्दलची सविस्तर माहिती दिली व वाचनाचे महत्व विद्यार्थ्यांच्या जीवनात कसे
महत्वाचे असते याबाबत मार्गदर्शन केले. शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या
घरी लोकराज्य मासिक पोहचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. असे शाळेचे अध्यक्ष शिरीष
रायसोनी यांनी आश्वासन दिले. कार्यक्रमाला ज्येष्ट पत्रकार श्री. विजय पाठक,
पत्रकार राजेंद्र पाटील, रायपूरचे पोलीस पाटील रामसिंग परदेशी, शाळेचे शिक्षकवृंद,
जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment