Wednesday, 12 September 2018

लोकराज्य मासिक सर्वांसाठी उपयुक्त - श्रीराम पाटील





        जळगाव दि.12:- लोकराज्य मासिकातील माहिती ही शालेय विद्यार्थ्यांपासून जेष्ठ नागरिकापर्यंत सर्वांसाठी महत्वपूर्ण असल्याने हे मासिक सर्वांना उपयुक्त आहे असे प्रतिपादन ऐनपूर शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन श्रीराम पाटील यांनी केले.
            जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव आणि सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात लोकराज्य वाचक अभियानातंर्गत वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानवरून उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्रीराम पाटील बोलत होते.
           याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, रावेर तहसीलदार विजयकुमार ढगे, वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने, संस्थेचे सचिव संजय पाटील, द युनिक अकादमीचे संचालक सुनिल देशमुख, लक्ष्य करिअर अकादमीचे विजय पाटील, श्रीराम फांऊडेशनचे सचिव दीपक नगरे, कृष्णा पाटील आदी उपस्थित होते.
            यावेळी पुढे बोलतांना श्री.पाटील म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या जमान्यात विद्यार्थ्यांचे वाचन कमी झाले असून वाचन संस्कृती टिकून राहण्यासाठी लोकराज्य वाचक अभियान महत्वपूर्ण आहे. या अभियानाचा लाभ विद्यार्थांनी घेऊन स्वतःचा व्यक्तिमत्व विकास साधावा. लोकराज्य हे मासिक शासनाची महत्वपूर्ण माहिती सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करीत असल्यामुळे या मासिकाचे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वर्गणीदार व्हावे असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.
           स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लोकराज्य मासिकातील माहिती महत्वपूर्ण असल्याने या मासिकाचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करतांना उपयोग करावा. तसेच युवा माहिती दूत या उपक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी केले.
           लोकराज्य वाचक अभियानाचा उद्देश तसेच युवा माहिती दूत उपक्रमाबाबतची माहिती जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी विषद केली. स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी, अभ्यासाचे स्वरूप आदींबाबत द युनिक अकादमीचे संचालक सुनील देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
          कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने यांनी लोकराज्य वाचक मेळावा आयोजना मागील भूमिका स्पष्ट  केली.
          कार्यक्रमाच्या सुरुवातीस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच लोकराज्य मासिकाच्या सप्टेंबर महिन्याच्या सामर्थ्य शिक्षणाचे समृद्ध महाराष्ट्राचे या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवा माहिती दूत उपक्रमाची चित्रफित विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली.
         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.एस.एन.वैष्णव यांनी तर उपस्थितांचे आभार दीपक नगरे यांनी मानले. या मेळाव्यास ऐनपूर महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                                                    000

No comments:

Post a Comment