Thursday, 27 September 2018

पणन महासंघातर्फे जिल्ह्यात कडधान्य खरेदीसाठी नोंदणी सुरु


मुग खरेदीची ६९७५ रू. आधारभूत किंमत
उडीद खरेदीची ५६०० रू. आधारभूत किंमत
सोयाबीन खरेदीची ३३९९ रू आधारभूत किंमत निश्चित
            जळगांव दि. 27:-  जिल्ह्यात  खरीप पणन हंगाम 2018-19 मध्ये नाफेडच्यावतीने खरेदी करावयाच्या मुग, उडीद व सोयाबीन या कडधान्यांची  नोंदणी मार्केटिंग फेडरेशनमार्फत सुरु करण्यात आलेली असुन यावर्षी केंद्र सरकारने मुगासाठी रु.6975/- उडीदासाठी रु.5600/- व सोयाबीनकरिता रु.3399/- इतकी किमान आधारभूत किमंत जाहीर केलेली  आहे. याचा जास्तीत जास्त  शेतकऱ्यांनी लाभ  घ्यावा असे आवाहन  जिल्हा मार्केटिंग अधिकारी  यांनी एका पत्रकान्वये केले आहे.
             जिल्ह्यात मागील वर्षाप्रमाणे जळगाव, पाचोरा व अमळनेर येथे नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे. जळगाव येथे नोंदणी करिता उपअभिकर्ता संस्था म्हणून जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सेवा सहकारी संस्था लि, विसनजी नगर, जळगाव, पाचोरा येथे शेतकरी सहकारी संघ लि, भडगाव तसेच अमळनेर येथे अमळनेर तालुका शेतकरी सह संघ लि, अमळनेर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 
            शेतकऱ्यांनी नोंदणी करिता जळगाव येथे कृषि औद्योगिक संघाच्या विसनजी नगर येथील कार्यालयात, पाचोरा येथे भडगाव संघाच्या पाचोरा मार्केट कमिटी आवारातील आडत दुकानात तसेच अमळनेर येथे शेतकी संघाच्या कार्यालयात संपर्क साधावा. नोंदणी करिता शेतकऱ्यांनी आधार कार्डची सत्यप्रत, तसेच चालू वर्षाचा मुग, उडीद व सोयाबीन पिकाची नोंद असलेला 7/12 उतारा सादर करावयाचा आहे. तसेच आधार कार्डशी लिंक असलेले बैंकेचे खाते नंबर द्यावयाचे आहे. मुग व उडीदाची नोंदणी दि. 9 ऑक्टोबर 2018 अखेर पर्यंत सुरु राहणार असुन सोयाबीनची नोंदणी दि.1 ऑक्टोबर 2018 ते 31 ऑक्टोबर 2018 या कालावधीत करण्यात येईल.
            ज्या तालुक्यामध्ये खरेदी केंद्र नाहीत अशा तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या नजीकच्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर नोंदणी करावयाची आहे. नोंदणी  झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीच्या क्रमांकानुसार खरेदी साठी मेसेज करण्यात येईल त्यानुसार मेसेज आलेल्या शेतक-यांचेच धान्य खरेदी केंद्रावर करण्यात येईल तसेच एफएक्यु प्रतिच्या 12% पर्यंत आद्रता असलेला माल खरेदी करण्यात येईल. उपअभिकर्ता संस्थाना खरेदी करण्यात आलेल्या शेतमालाची लॉट एन्ट्री त्याच दिवशी करणे बंधनकारक असेल. शेतकऱ्यांना शेतमालाची रक्कम ही त्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या खात्यावर अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले खाते आधारशी संलग्न असल्याची खात्री करावी. शेतक-यांकडून प्राप्त झालेल्या 7/12 ची पोर्टलवर नोंदविलेल्या पिकपेरा क्षेत्राची स्थळ पाहणी महसुल व कृषि विभागाकडून करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
००००

No comments:

Post a Comment