Sunday, 2 September 2018

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरीता बांधण्यात येणाऱ्या राज्यातील पहिल्या शासकीय तंत्रनिकेतन इमारतीचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांच्या हस्ते भूमिपुजन संपन्न







               जळगांव, दि. 2 - शासनाच्या उच्च तंत्र व अल्पसंख्यांक विकास विभागाच्यावतीने अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरीता 87 कोटी 50 लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या राज्यातील पहिल्या तंत्रनिकेतन इमारतीचे भूमिपुजन आज मुक्ताईनगर, जि. जळगाव येथे राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकात पाटील यांच्या हस्ते संपन्न  झाले.
यावेळी राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार रक्षाताई खडसे, आ. एकनाथराव खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकुमार महाजन, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष महम्मद हुसेन खान, माजी आमदार गुरुमुख जगवाणी आदि उपस्थित होते.     
            अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सिस्थतीचा अभ्यास करुन समाजाच्या शिक्षणाच्या आवश्यकतेनुसार मुक्ताईनगर, जि. जळगाव येथे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी- विद्यार्थीनी करीता नवीन शासकीय तंत्रनिकेतन संस्था सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार आज या तंत्रनिकेतनचे भुमिपूजन करण्यात आले. रावेर, यावल, भुसावळ, बोदवड तसेच विदर्भातील तालुके मलकापुर, मोताळा, दाताळा या तालुक्यापासून जवळच असलेल्या मुक्ताईनगर, जि.जळगाव येथे ही संस्था सुरू होणार असल्याने या शैक्षणिक संस्थेच्या निर्मीतीमुळे या परिसरातील अनेक अल्पसंख्यांक व इतर समाजातील मुलांना तंत्रशिक्षणाचा लाभ होणार आहे. तसेच तांत्रीक मनुष्यबळ निर्माण होण्यास मदत होणार आहे.
            अल्पसंख्यांक समाजात मुस्लीम, बौध्द, ख्रिश्चन, शिख, जैन व पारशी या  समाजाचा समावेश होतो. मुक्ताईनगर येथे सुरु होणाऱ्या राज्यातील पहिल्या तंत्रनिकेतनमध्ये अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी  प्रवेश  दिले जाणार  आहेत. यात स्थापत्य अभियांत्रिकी  60, तंत्रनिकेतन अभियांत्रिकी 60, विद्युत अभियांत्रिकीसाठी 60, अणुविद्युत व दूरसंचारणासाठी  60 आणि स्वयंचलन अभियांत्रिकीसाठी 60 असे एकूण 300 अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. या शैक्षणिक संस्थेत अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी 70 टक्के तर सर्वसाधारण व राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना 30 टक्के प्रवेश देण्यात येणार आहे. 70 टक्के कोट्यातून प्रवेशकरीता पुरेशा प्रमाणात उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशा रिक्त जागेवर सर्वसाधारण व राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार आहे. या तंत्रनिकेतनसाठी तीन वर्षात टप्प्याटप्याने 163 पदे निर्माण करण्याचे प्रस्तावित असून तंत्रनिकेतनसाठी शासनाने मुक्ताईनगर येथे गट क्र. 630 मध्ये एकुण 08.50 हेक्टर आर एवढी शासकीय जमीन मंजूर करण्यात आली आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी  57 कोटी 56 लाख 22 रुपये हजार खर्च होणार असून मुलांचे व मुलींचे स्वतंत्र वसतीगृह, उपहारगृह बँक व सुविधासाठी 21 कोटी रुपये, प्राचार्य व अधिकारी, कर्मचारी निवासस्थानासाठी 8 कोटी 94 लाख 30 हजार खर्च करण्यात येणार आहे.
000

No comments:

Post a Comment