Tuesday, 29 January 2019

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न आपले सरकार सेवा केंद्रामार्फत नागरीकांना आवश्यक सुविधा उपलब्ध होणे आवश्यक - गोरक्ष गाडीलकर


      

           जळगाव, दि. 29 - ग्रामीण भागातील नागरीकांना आवश्यक त्या सोईसुविधा गावातच उपलब्ध व्हाव्यात. यासाठी शासनाने आपले सरकार सेवा केंद्र सुरु केले आहे. या केंद्रामार्फत गावातील नागरीकांना शासन नियमानुसार देय असलेल्या सुविधा उपलबध करुन देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले.
            जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात श्री. गाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस शासकीय सदस्य जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद शिंदे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, पोलीस निरिक्षक अरुण निकम यांचेसह अशासकीय सदस्य उपस्थित होते.
            ग्रामीण भागातील नागरीकांना मुलभुत सुविधा उपलब्ध होण्यासाठी शासनाने आपले सरकार सेवा केंद्र गावपातळीवर सुरु केले आहे. या केंद्रामार्फत नागरीकांना शासन नियमानुसार सुविधा गावातच मिळणे आवश्यक आहे. परंतु काही सेवा केंद्र सुविधांसाठी नागरीकांची अडवणूक करीत असल्याची तक्रार अशासकीय सदस्य नरेंद्र पाटील यांनी बैठकीत केली होती. त्याचबरोबर एरंडोल शहरातील जुना महामार्ग रस्ता अद्याप नगरपालिकेकडे हस्तांतरीत न झाल्याने नगरपालिका रस्ता दुरुस्त करीत नाही. तरी सदरचा रस्ता नगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यात यावा. एरंडोल शहरातील अंजनी नदी पात्राची साफसफाई होण्याची सुचना प्रा. श्रीराम अहिरराव यांनी मांडली यावर नगरपालिका मुख्याधिकारी व प्रांताधिकारी यांची बैठक बोलविण्याची निर्देश श्री. गाडीलकर यांनी दिले. यावल शहरातील बाजार मोकळया जागेत हलविणे, शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणेबाबतची सुचना श्री. वाणी यांनी मांडली. तसेच शालेय पोषण आहाराच्या गोण्यांचे वजन कमी भरत असल्याची तक्रारही या बैठकीत करण्यात आली. यावर कार्यवाही करण्याच्या सुचना श्री. गाडीलकर यांनी सर्व संबंधित विभागांना दिल्यात.
            ग्राहक संरक्षण परिषदेच्या माध्यमातून ग्राहकांच्या हिताचे रक्षण होणारे अनेक निर्णय आतापर्यंत झाल्याबद्दल अशासकीय सदस्यांनी प्रशासनाचे कौतूक केले. त्याचबरोबर अनेक अशासकीय सदस्यांनी ग्राहकांच्या हिताचे प्रश्न बैठकीत मांडल्याबद्दल या सदस्यांचेही बैठकीत अभिनंदन करण्यात आले. यावेळी अशासकीय सदस्यांना परिषदेचे सदस्याचे ओळखपत्र देण्यात आले.
000

No comments:

Post a Comment