Thursday, 17 January 2019

रमाई आवास योजनेतील घरकुलांचे काम पूर्ण करण्यास प्राधान्य द्या - अपर जिल्हाधिकारी गाडीलकर


            जळगाव, दिनांक 17 - रमाई आवास योजनेतंर्गत शहरी भागात बांधण्यात येणारी घरकुले तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी नगरपालिका प्रशासनाने आवश्यक ते नियोजन करुन ही घरकुले प्राधान्याने पूर्ण करा. अशा सूचना अपर जिल्हाधिकारी  गोरक्ष गाडीलकर यांनी सर्व संबंधित यंत्रणेला दिल्यात.
            जिल्हास्तरीय सामाजिक विकास शक्ती प्रदत्त समितीची बैठक अपर जिल्हाधिकारी श्री. गाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस समितीचे सदस्य जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबीता कमलापूरकर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर, सहायक प्रकल्प संचालक पी. सी. शिरसाठ, सदस्य सचिव तथा समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटिल यांचेसह समितीचे सदस्य उपस्थित होते.
            यावेळी बोलतांना श्री. गाडीलकर पुढे म्हणाले की, केंद्र शासनामार्फत सर्वांसाठी घरे ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रासाठी रमाई आवास योजनेचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. परंतु दिलेल्या उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात काम होत नाही. जिल्हयाला नगरपालिका भागात 2215 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी 922 घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे. तर 502 घरकुले पूर्ण झाली आहे. 122 घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे. तर महानगरपालिका क्षेत्रात 30 मंजूर घरकुलांपैकी 16 घरकुले पूर्ण झाली असून 6 घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे. लाभार्थ्यांना विहित वेळेत घरकुले देण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ते नियोजन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी रमाई आवास योजना ग्रामीणचाही आढावा घेतला. व उपलब्ध निधी अखर्चित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना दिल्यात.अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत जिल्ह्यातील विविध यंत्रणांना दिलेला निधी विहित वेळेत खर्च होईल यासाठी यंत्रणांनी काम करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्यात.
            जिल्ह्यातील 12 शासकीय वसतीगृहे, 1 निवासी शाळा, व 46 आश्रमशाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या 6192 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी पूर्ण झाल्याची माहिती सहायक आयुक्त श्री. पाटील यांनी  बैठकीत दिली.
000

No comments:

Post a Comment