Tuesday, 1 January 2019

महिला आयोग तुमच्या दारी’ उपक्रमाद्वारे जळगाव येथे ४ जानेवारी रोजी जनसुनावणी पिडीत महिला मांडू शकणार आपल्या समस्या

            जळगाव,दि.१:-  महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्यावतीने ‘महिला आयोग तुमच्या दारी’ या उपक्रमाद्वारे शुक्रवार, दि. ४ जानेवारी, २०१९ रोजी सकाळी १०.३० वाजता अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे जनसुनावणी घेण्यात येणार आहे. अशी माहिती रमेश काटकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जळगाव यांनी दिली आहे.
      या जनसुनावणीस महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर या उपस्थित राहणार आहेत. तक्रारदार पिडीत महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कोणतीही पिडीत महिला पुर्वसुचना न देतासुद्धा थेट सुनावणीस उपस्थित राहून आपली लेखी समस्या आयोगासमोर मांडू शकणार आहे.
     तक्रारदार पिडीत महिलांनी आपली लेखी समस्या घेवून आयोगासमोर उपस्थित रहावे. या जनसुनावणीसाठी आयोगाच्या अध्यक्षा, सदस्या, संबंधित जिल्हाधिकारी किंवा कार्यालयीन प्रतिनिधी, विधी सेवा प्राधिकरणाचे विधी तज्ञ, पोलीस विभागाकडून वरीष्ठ पोलिस अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, संरक्षण अधिकारी, महिला व मुलांचे सहाय्य कक्षाचे समुपदेशक, जिल्हा समन्वयक उपस्थित राहणार आहेत.
जिल्ह्यातील पिडीत महिलांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे आवाहन श्री. काटकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.
                                                                              000

No comments:

Post a Comment