Wednesday, 16 January 2019

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून प्रवेश पात्रता परिक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

         जळगाव, दि. 16 - महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ‘राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय’ डेहराडून (उत्तरांचल) येथे इ. ८ वी साठी प्रवेश पात्रता परीक्षा दिनांक १ व २ जून, २०१९ रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्याचे वय दि. 1 जानेवारी, 2020 रोजी साडेअकरा वर्षापेक्षा (अकरा वर्ष सहा महिने) कमी व 13 वर्षापेक्षा अधिक नाही, असे विद्यार्थी पात्र समजण्यात येणार आहे. म्हणजेच जन्म 2 जानेवारी, 2007 ते दि. 1 जुलै, 2008 या कालावधीतील असावा. विद्यार्थी दिनांक 1 जानेवारी, 2020 ला कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमध्ये इ. 7 वी या वर्गात शिकत असावा किंवा 7 वी उत्तीर्ण असावा. ही परीक्षा फक्त मुलांसाठीच आहे. 
          परीक्षेसाठी कमांडंट, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून उत्तरांचल 248003 यांचेकडून विहीत नमुन्यातीलच आवेदनपत्रे घ्यावयाची आहेत. विद्यार्थ्यांनी अनुसुचित जाती/जमातीसाठी रु 555/- (जातीच्या दाखल्याच्या सत्यप्रतीसह) आणि जनरल संवर्गातील विद्यार्थ्यांनी रु 600/- चा डिमांड ड्राफट देणे आवश्यक आहे. सदर ड्राफट फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचाच कमांडंट आर.आय. एम.सी. डेहराडून यांचे नावे काढावा, ड्राप्फटवर पेअेबल ॲट डेहराडून (तेलभवन बँक Code No. 01576) अशी नोंद करावी.
     आवेदनपत्र माहितीपत्र व मागील 5 वर्षाचे प्रश्नपत्रिका संच ड्राफट पाठविल्यानंतर कमांडंट, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून उत्तरांचल 248003 यांचेकडून पोस्टाने पाठविण्यात येतील. परिपूर्ण भरलेली आवेदनपत्रे दि. 31 मार्च, 2019 पर्यंत आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, 17 डॉ. आंबेडकर मार्ग, लाल देवळाजवळ, पुणे-411001 यांचेकडे पोहचतील अशा प्रकारे स्पीड पोस्टाने पाठवावीत किंवा समक्ष जावून जमा करावीत. त्यांनतर आलेली आवेदनपत्रे कोणत्याही परिस्थितीत स्विकारण्यात येणार नाहीत. आवेदनपत्र दोन- प्रतीत भरणे आवश्यक आहे. व त्यासोबत जन्मतारखेच्या दाखल्याची प्रत, जातीच्या दाखल्याची (अनुसुचित जाती/जमातीसाठी) छायांकित एक प्रत, अधिवासी दाखल्याची (Domicile Certificate) प्रत जोडणे आवश्यक आहे. तसेच शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकिटची मुळ प्रत जोडणे आवश्यक आहे.
    परीक्षेसाठी इंग्रजी, गणित आणि सामान्यज्ञान या तीन विषयांचे लेखी पेपर असतील. परीक्षार्थीना गणिताचा व सामान्यज्ञानाचा पेपर इंग्रजी अथवा हिंदीमध्ये लिहिता येईल. गणित व सामान्यज्ञान विषयांच्या प्रश्नपत्रिका इंग्रजी, हिंदी या भाषेत उपलब्ध होतील. लेखी परिक्षेत उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांच्या मुलाखती शुक्रवार, दि. 4 ऑक्टोबर, 2019 रोजी घेण्यात येतील. अधिक माहितीसाठी 020-2612306667 या क्रमांकावर संपर्क करावा. असे आवाहन तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
                                                                             ०००

No comments:

Post a Comment