Wednesday, 16 January 2019

लोकशाही अधिक सदृढ होण्यासाठी मतदार जनजागृतीचे काम अधिक प्रभावीपणे होणे आवश्यक - अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर




     जळगाव, दि. 16 - जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारत परिचित असताना लोकसभा व विधानसभा निवडणूकीत 60 ते 65 टक्यांपेक्षा जास्त मतदान होत नाही. निवडणूकीतील मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून भारत निवडणूक आयोगाने राज्य, विभाग, जिल्हा, तालुका आणि मतदान केंद्र स्तरावर मतदारांमध्ये जनजागृती व्हावी. याकरीता मतदार जागरुकता मंच स्थापन करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्या सुचनांचे निवडणूकीतील सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे पालन करावे व आपली भारतीय लोकशाही अधिक सदृढ करण्यासाठी राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून काम करावे. असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी नियोजन भवन सभागृहात आयोजित मतदार जागरूकता मंचाच्या उद्घाटन प्रसंगी  केले.
     याप्रसंगी उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद शिंदे, उप विभागीय अधिकारी, जळगाव जितेंद्र पाटील, महसूल उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, पाचोऱ्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, विशेष भूसंपादन अधिकारी रामसिंग सुलाने, निवडणूक तहसीलदार सुरेश थोरात, निवडणूक शाखेतील सर्व अधिकारी, विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.
     प्रारंभी पाचोरा उप विभागाचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी निवडणूक प्रक्रीयेसाठी उप विभागीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना भारत निवडणूक आयोगास अपेक्षित मतदार जागरूकता मंच स्थापनेचा उद्देश, संबंधित यंत्रणेने करावयाची कामे, नविन मतदारांना मार्गदर्शन आणि मतदानाचे महत्व, जनता,  विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांनी केलेल्या शंकांचे यथोचित समाधान कसे करावे. याबाबत सविस्तर  मार्गदर्शन करून काही महत्वाच्या सूचना केल्यात.
     उप जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद भामरे यांनी प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयात तसेच विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुखांनी आप-आपल्या अखत्यारित कार्यालयांना मतदार जागरूकता मंचाची स्थापना करण्याच्या सूचना कराव्यात. मंचाला कुठलीही तांत्रीक अडचण असल्यास निवडणूक शाखेकडून योग्य ती मदत करण्यात येईल. तसेच मंचातर्फे विविध चर्चासत्रे, प्रश्नमंजूषा असे जागृतीपर कार्यक्रम आयोजित करावे.
     शेवटी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाचे प्रात्याक्षिक दाखवून उप जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद भामरे यांनी मतदारांसाठी प्रतिज्ञा दिली.
                                                                           000

No comments:

Post a Comment