Friday, 13 October 2017

प्रधानमंत्री आवास योजना अंमलबजावणी कार्यशाळा संपन्न प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे सर्व्हेक्षण 31 ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करावे - जिल्हाधिकारी निंबाळकर

*प्रधानमंत्र्यांचे ‘सर्वांसाठी घरे’ चे स्वप्न सर्वजण मिळून पूर्ण करु या *
                                                                                  - खा. ए. टी. नाना पाटील
           जळगाव, दि. 13 - प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून जिल्हयातील गरजू लाभार्थ्यांना घरांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेले सर्व्हेक्षणाचे काम सर्व नगरपालिकांनी येत्या 31 ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावे. जळगाव शहरात या योजनेतंर्गत सर्वांसाठी घरे बांधण्यासाठी महानगरपालिकेने दोन विकास प्रकल्प आराखडे तयार करुन ते मान्यतेसाठी म्हाडाकडे पाठविण्यात आले आहे. या आराखडयास म्हाडाची मान्यता मिळाल्यानंतर शहरातील लाभार्थ्यांचे स्वत:च्या घरकुलाचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. असा आशावाद जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी व्यक्त केला.
         प्रधानमंत्री आवास योजनेच्या सर्वांसाठी घरे-2022 या योजनेच्या जिल्हा पातळीवरील उद्दष्टिपूर्तीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी येथील नियोजन भवनात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन जळगावचे खासदार ए. टी. नाना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर हे होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. निंबाळकर बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर हुडकोच्या उप महाव्यवस्थापक श्रीमती वैजयंती महाबळे, म्हाडाचे अधिक्षक अभियंता दिलीप मुगळीकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपालिका) श्री. राजेश कानडे, लिड बँकेचे समन्वयक श्री. दामले उपस्थित होते.
        उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून जिल्हयातील ग्रामीण भागात रमाई, शबरी व पारधी या विविध घरकुल योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शहरी भागातही सन 2011 च्या जनगणनेनुसार लाभार्थ्यांचे सर्व्हेक्षण सुरु आहे. हे सर्व्हेक्षणाचे काम ऑक्टोबर अखेर पूर्ण करावे. झोपडपट्टयांचे पुनर्वसन करावे. तसेच खाजगी भागीदारीमार्फत परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचा सुचनाही मुख्याधिकारी यांना दिल्या.
           कार्यशाळेचे उद्घाटक खा. ए.टी. नाना पाटील म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन 2022 पर्यंत देशातील 5 कोटी नागरीकांना परवडणारी घरे देण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पानुसार जिल्हयातील कोणीही गरजू लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करु या. या योजनेच्या माध्यमातून झोपडपट्टयांचा पुर्नविकास करावा. तसेच नागरीकांना हक्काची पक्की घरे देण्यासाठी बँकांनीही मदतीचे धोरण ठेवून गरजूंना आर्थिक मदत करण्याचे आवाहनही त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना केले.
         कार्यशाळेच्या प्रास्ताविकात जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपालिका) श्री. कानडे यांनी कार्यशाळा आयोजनामागील भूमिका विशद केली. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील जळगाव शहर महानगरपालिका- 18 हजार 61, भुसावळ नगरपरिषद- 7 हजार 304, अमळनेर - 3 हजार 217, चाळीसगाव- 3 हजार 867, चोपडा- 2 हजार 978, पाचोरा- 2 हजार 691, जामनेर- 2 हजार 116, एरंडोल- 1 हजार 419, धरणगाव- 847, पारोळा- 1 हजार 680, रावेर- 1 हजार 193, यावल- 1 हजार 670, सावदा, वरणगाव, भडगाव, फैजपूर प्रत्येकी 847 तर बोदवड नगरपंचायतीस 846 असे एकूण  51 हजार 277 घरे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
          कार्यशाळेतील उपस्थितांना मार्गदर्शन करताना हुडकोच्या उप महाव्यवस्थापक श्रीमती वैजयंती महाबळे म्हणाल्या की, प्रधानमंत्री आवास योजना ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरीकाला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. नागरीकांना आर्थिक मदत करण्यासाठी प्रथमच या प्रकल्पामध्ये सहकारी बँकांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. देशातील 4 हजार 41 तर राज्यातील 372 शहरांमध्ये ही योजना राबविण्यात येत असल्याचेही श्रीमती महाबळे यांनी सांगितले.
           तसेच म्हाडाचे अधिक्षक अभियंता दिलीप मुगळीकर यांनी प्रधानमंत्री आवास योजनेत म्हाडाची असलेली भूमिका विशद केली.
         कार्यशाळेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आली. या कार्यशाळेत जिल्ह्यातील नगरपरिषदांचे मुख्याधिकारी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यशाळेस जिल्हयातील नगरपरिषदांचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, खाजगी विकासक, विविध बँकांचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार पी.जी. सोनवणे यांनी मानले.
                                                                        000

No comments:

Post a Comment