Wednesday, 11 October 2017

पर्यटकांना प्रोत्साहित करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देणार - जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर



            जळगाव, दि. 11 - जिल्हयात मोठया प्रमाणात जुनी पर्यटनस्थळे आहेत. या पर्यटनस्थळांना भेटी देण्याकरीता पर्यटकांना प्रोत्साहित करण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत व मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली.
            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी पर्यटन ही संकल्पना मांडली असून 5 ते 25 ऑक्टोबर 2017 या कालावधीत देशात पर्यटन पर्वसाजरा करण्यात येत आहे. या संकल्पनेचा भाग म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या उपस्थितीत पर्यटन पर्व कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक नितिन मुंडावरे, जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश वाघ, आर्यन पर्यावरण पर्यटन केंद्राच्या डॉ. रेखा महाजन, गांधी रिसर्च फाऊडेशनचे भुजंग बोबडे यांचेसह ट्रॅव्हल एजंटस, टूर ऑपरेटर, हॉटेल चालकांचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.
             यावेळी श्री. निंबाळकर पुढे म्हणाले की, जिल्हयात स्थानिक पातळीवर पर्यटन वाढविणे आवश्यक असून यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. जागतिक वारसा लाभलेल्या अजिंठा लेणी ला भेट देण्यासाठी येणारे पर्यटक हे जळगाव मार्ग येण्यासाठी जळगाव येथून विमानसेवा सुरु व्हावी यासाठी लागणाऱ्या सर्व प्रशासकीय परवानग्या देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जिल्हयातील पर्यटन स्थळांचा विकास होण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
            जिल्हयातील पर्यटन स्थळांची नागरीकांना माहिती व्हावी यासाठी वेबसाईट सुरु करावी. जिल्हयातील सर्व पर्यटनस्थळांना पर्यटकांना भेट देता यावी यासाठी जळगाव दर्शन बस सुरु करावी. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटकांना इतर सर्व पर्यटनस्थळांची माहिती एकत्रित मिळावी यासाठी फलक लावणे. जिल्हयात पर्यटनाला चालना मिळावी यासाठी खान्देश महोत्सव, भरीत पार्टीसारखे महोत्सव सुरु करावेत. मेहरुण तलाव येथे बोटींग सुरु करणे आदि सुचना विविध संस्थांच्या प्रतिनिधीनी बैठकीत मांडल्या.
            पर्यटन हे फक्त आंतरराष्ट्रीय, परदेशी पर्यटकांसाठीच नसून पर्यटनाचा आनंद स्थानिक लोकांना देखील घेता आला पाहिजे. स्थानिक पर्यटकांचा पर्यटनामध्ये सहभाग वाढून पर्यटन विकास साधणेसाठी दिवाळी हंगामातील सुटीचा आनंद पर्यटकांनी पर्यटनामध्ये व्दिगुणित करणेसाठी पर्यटन पर्वहा उपक्रम साजरा  करण्यात येत असल्याची माहिती प्रादेशिक व्यवस्थापक श्री. मुंडावरे यांनी बैठकीत दिली.    
जळगाव येथील अनाथ, अपंग मुलांना गांधीतीर्थ येथे पर्यटन सहल घडविली जाणार
            पर्यटन पर्व कार्यक्रमांत स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक कार्यालये यांच्या संयुक्त विद्यमाने व पर्यटन क्षेत्राशी निगडीत व्यावसायिकांच्या सहकार्याने स्थानिक कला, संस्कृती, पाककृती व पर्यटन स्थळे यांची ओळख घडविण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. पर्यटन पर्व कार्यक्रमाविषयी पर्यटकांमध्ये जनजागृती होण्यासाठी स्टेकहोल्डर (ट्रॅव्हल एजंटस, टूर ऑपरेटर, हॉटेल चालक इ. ) यांच्यासोबत विविध कार्यक्रम राबवून पर्यटक आकर्षित करण्यात येणार आहे. स्थानिक खाद्यसंस्कृती जोपासणे, स्थानिक कलाकुसरीस प्रोत्साहन, सांस्कृतिक कार्यक्रम राबविणे, शालेय विदयार्थीमध्ये जनजागृती होण्यासाठी जिल्हयातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये पर्यटन विषयक व्हिडिओचे सादरीकरण करण्यात येणार आहे. जेणेकरुन नवीन पिढीमध्ये पर्यटन विषयक जागृती निर्माण होवून पर्यटन विकास साधला जाण्यास मदत होणार आहे. या कालावधीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व हॉटेल टुरिस्ट जळगाव मे. ओम असोसिएटसचे पार्टनर श्री. दिलीप पंजाबी व श्री. नवीन ठक्कर व पर्यटन महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हयातील अनाथ, अपंग मुलांना गांधीतीर्थ येथे पर्यटन सहल घडविली जाणार आहे.
विजेत्यांना महामंडळाच्या एका पर्यटन निवासात एक रात्र, दोन दिवस मोफत राहण्याची व्यवस्था
            पर्यटन विकास महामंडळातर्फे  शालेय विदयार्थ्यासाठी अद्भुत महाराष्ट्र प्रवास वर्णन या विषयावरील निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये विभागातील प्रत्येक जिल्हयातून विजेते निवडले जाणार आहेत. विजेत्यांना महामंडळाच्या कोणत्याही एका पर्यटन निवासात 1 रात्र, 2 दिवस मोफत राहण्याची व्यवस्था उपलब्ध करुन दिली जाणार आहे. पर्यटन पर्वात पर्यटन स्थळी भेट देणा-या पर्यटकांचा सहभाग वाढविणेसाठी स्वच्छता अभियान, पेंटिंग, एक्सप्रेशन वॉल, पारंपारिक खेळ, महाराष्ट्रीयन खाद्य, सहल, विविध सवलत लकी ड्रॉ, फोटो कॉन्टेस्ट या  कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच पर्यटन स्थळी भेट देणा-या पर्यटकांचा सहभाग वाढवून पर्यटन स्थळांची माहिती सर्वश्रूत करणेसाठी पर्यटकांसाठी स्पॉट क्विज स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये अचूक उत्तर देणा-या पर्यटकांना महामंडळाचे कॉफी टेबल बुक व माहितीपत्रके भेट म्हणून देण्यात येणार आहे. महामंडळाच्या महाभ्रमण योजनेत नोंदणीकृत असलेल्या योजनाधारकांना त्यांचे अनुभव एकमेकांमध्ये कथन करुन त्याव्दारे पर्यटन विकास साधणेसाठी महामंडळामार्फत नाशिक येथे वर्कशॉपचे आयोजन करण्यात येणार आहे. महामंडळामार्फत राबविल्य जाणा-या पर्यटन पर्व कार्यक्रमात स्थानिक पर्यटकांनी मोठया प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर  व प्रादेशिक व्यवस्थापक श्री. मुंडावरे यांनी केले आहे.
०००००

No comments:

Post a Comment