Friday, 13 October 2017

आपत्तीजन्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडले मॉकड्रिल 40 प्रशिक्षीत स्वयंसेवकांनी करुन दाखविले प्रात्यक्षिक




              जळगाव, दि. 13 - दुपारी तीनची वेळ, सर्वजण आपापल्या कामात व्यस्त असतात, अचानक दूरध्वनीचा आवाज खणाणतो, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाचा फोन असतो. समोरुन घाबरलेल्या अवस्थेत आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाचा कर्मचारी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात बाँबस्फोट झाल्याची माहिती देतो. स्फोटाचा मोठा आवाज.. बॉम्बस्फोटामुळे मोठी आग लागली. ठिक तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सायरनच्या आवाज होतो. सायरनमुळे सर्व शाखांमधील महिला व पुरुष अधिकारी, कर्मचारी यांना धोक्याचा इशारा देण्यात येतो. धोक्याचा इशारा मिळताच  सर्व शाखांमधील महिला व पुरुष अधिकारी आपले कामकाज थांबवून, आपले संगणक बंद करुन व शाखेतील विद्युत उपकरणे बंद करुन कार्यालयाच्या बाहेर पडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील मोकळया जागेत एकत्र जमा होतात.
              दुपारी तीन वाजून 30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बचाव कार्यासाठी पोलीस अधिक्षक, पोलीस नियंत्रण कक्षातील बॉम्ब शोधक व बॉम्ब विनाशक पथक तसेच जळगाव शहर महानगरपालिका, जैन इरिगेशन, भुसावळ नगरपरिषद, वरणगाव ऑर्डिनन्स फॅक्टरी,  दीपनगर येथील अग्निशमन पथकाच्या गाडया तसेच बचावासाठी जिल्ह्यातील होमगार्ड पथक, जिल्हा सामान्य रुग्णालयातील 108 ॲम्बुलन्स, रेडक्रॉस सोसायटीची रक्तदान व्हॅन वैद्यकीय सुविधा घेवून जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्या.
              दुपारी तीन वाजून 35 वाजता बॉम्ब शोध व विनाशक पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयातील वाहन पोर्चमध्ये ठेवलेला बॉम्ब शोधून त्याला निकामी केला. तसेच तीन वाजून 40 मिनिटांनी  छतावर लागलेल्या आगीला आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु असतानाच जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर हे वाहन पोर्चवरील छतावरुन जंपींगशॉटच्या माध्यमातून सुखरुप खाली आले. तसेच अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोरील पोर्चचे वरील दुसऱ्या मजल्यावरुन जखमी व्यक्तीला रोपलॅडरच्या सहाय्याने खाली उतरविण्यात आले. आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्तीजनक परिस्थितीला कशाप्रकारे सामोरे जायचे याचे मॉकड्रिल पार पडले.
              शहरात किंवा कार्यालयात आपत्तीकालीन घटना घडल्यानंतर कशाप्रकारे काळजी घ्यावी, यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात रंगीत तालीमचे आयोजन करण्यात आले होते. आपत्तीकालीन परिस्थितीची माहिती इमारतीतील ध्वनिक्षेपकावरुन करण्यात आल्यानंतर प्रत्येक मजल्यावरुन विहीत पध्दतीने व विहीत मार्गाने बाहेर पडण्याचे निर्देश सर्व कर्मचाऱ्यांना यापूर्वीच देण्यात आले होते. या निर्देशांचे पालन योग्यप्रकारे होते की नाही, यासाठी या मॉकड्रीलचे आयोजन करण्यात आले होते.
              ठिक चार वाजून 15 मिनिटांनी मॉकड्रील झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांना सर्व विभागाच्या  प्रमुखांनी त्यांनी केलेल्या कामाची माहिती दिली.
              त्यानंतर रेमंड इंडिया लि. जळगाव तर्फे रस्ते अपघात, प्रथमोपचार व बचावकार्य याबाबत प्रात्यक्षिक व पथनाट्य सादर करण्यात आले. 4 वाजून 30 वाजता उपस्थितांसमोर जिल्हाधिकारी कार्यालयातील शिपाई वर्गाने फायर एस्टींगशर च्या सहाय्याने आग विझविण्याचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापनाने घ्यावयाची काळजी या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. सर्वांनी आपली कामगिरी चोख पार पाडल्याबदद्ल जिल्हाधिकाऱ्यांनी  सर्वांचे अभिनंदन करीत असतानाच अचानक जिल्हाधिकारी कार्यालयातील एका चिंचेच्या झाडावर साप आढळला. त्यावेळी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी स्नेकस्टिकच्या सहाय्याने सापाला पकडून त्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे काम केले. अशाप्रकारे हे मॉकड्रील पार पडले असून त्यासाठी अर्जुना बहुउद्देशिय संस्था, भुसावळ, वन्यजीव संरक्षण संस्था, जळगाव यांचे सहकार्य लाभले.
0000

No comments:

Post a Comment