Monday, 16 October 2017

जलसंपदा मंत्री गिरीष महाजन सहकुटुंब दिवाळी साजरी करणार यावल वनक्षेत्रातील आदिवासी पाड्यावर आदिवासी बांधवांच्या आरोग्याचे प्रश्न जाणून घेणार

    जळगाव, दि. 16 - राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आणि त्यांच्या सौभाग्यवती जामनेरच्या नगराध्यक्षा साधनाताई यांनी यावर्षीची दिवाळी (19 ऑक्टोबर) यावल वनक्षेत्रातील आदिवासी पाड्यावर साजरी करण्याचे ठरविले आहे. मंत्री महाजन यांनी गतवर्षीची दिवाळी पालघर जिल्हयातील आदिवासी पाड्यावर साजरी केली होती. त्यावेळी ना. महाजनांनी आदिवासींच्या घरात राहून आदिवासी बालकांच्या कुपोषणाची समस्या समजावून घेतली होती. त्यांनतर त्यांनी तेथील बालकांना पोषण आहार व औषधे पुरवठ्यात लक्ष घालुन त्यांना आवश्यक असलेली औषधे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले होते.
     याचधर्तीवर यावर्षीही मंत्री महाजन हे सामाजिक जाणीवेच्या भावनेतून व समाजाप्रती आपली असलेली आस्था जपण्यासाठी कुटूंबासह यावल परिसरातील दुर्गम भागातील आदिवासी पाड्यांवर दिवाळी साजरी करणार आहे. त्याचबरोबर तेथील लोकांच्या सोबत एकरुप होवून आदिवासी बांधवांची दिवाळी साजरी करण्याची पध्दत समजून घेऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणार असून त्यांचा खान-पानचा पाहुणचार ते करणार आहेत.
     ना. महाजनांनी नुकतेच फैजपूर येथे ग्रामीण भागातील पहिले महाआरोग्य महाशिबिर घेतले. त्याचधर्तीवर आदिवासी भागासाठी स्वतंत्र महाआरोग्य शिबिर घेण्याबाबतही ते यावेळी आदिवासी बांधवांशी विचारविनिमय करणार आहे.
000

No comments:

Post a Comment