Monday, 16 October 2017

किडनाशकांचा सुरक्षित वापर जनजागृतीसाठी कृषि विभागातर्फे अभियान राबविणार



        जळगाव, दि. 16 - किडनाशकांचा सुरक्षित वापर व हाताळणी याविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होण्यासाठी कृषि विभाग व किडनाशक कंपन्यांच्यावतीने संयुक्तरित्या जिल्हाभर अभियान राबविणार असल्याची माहिती कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी दिली.
            जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कृषि विकास अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा व कृषि विज्ञान केंद्र, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कीडनाशकांचा सुरक्षित वापर या विषयावर जागृती कार्यशाळा कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद येथे संपन्न झाली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी आत्माचे प्रकल्प संचालक शिवाजी आमले हे उपस्थित होते. तर व्यासपीठावर कृषि उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी मधुकर चौधरी, कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. हेमंत बाहेती उपस्थित होते.
    या कार्यशाळेस जिल्ह्यातील उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी, पंचायत समिती, मंडळ कृषि अधिकारी, कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक व विविध किडनाशक कंपन्याचे अधिकारी उपस्थित होते.
            कार्यशाळेच्या प्रास्ताविकात श्री. भोकरे यांनी किडनाशकांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांचे दाखले देत जिल्ह्यातील किडनाशकांचा वाढता वापर धोकेदायक असून कार्यशाळेचे महत्व सांगितले. किडनाशकांची खरेदी वाहतूक व साठवणूकीत घ्यावयाच्या काळजीबाबत श्री. मधुकर चौधरी यांनी मार्गदर्शन केले. किडनाशक वापरतांना घ्यावयाच्या काळजीबाबत श्री. सिध्दार्थ वाजगे यांनी मार्गदर्शऩ केले. तसेच किडनाशकांचा कार्यक्षम वापर व संरक्षण साधने याविषयी डॉ. हेमंत बाहेती, कीडनाशक फवारणी यंत्रे व देखभाल याविषयी श्री. वैभव सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.
       या कार्यशाळेत किडनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी, किडनाशकांचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम व विषबाधेची लक्षणे, यावर करावयाचे प्राथमिक उपचार याविषयी चित्रफीत व प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच फवारणीच्या वेळी वापरावयाचे फवारणी किट याचेही प्रात्याक्षिक दाखविण्यात आले.
०००००

No comments:

Post a Comment