जळगाव, दि. २५ - महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत प्रतीवर्षी शिवछत्रपती राज्य
क्रीडा पुरस्कार देण्याची योजना आहे. राज्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, साहसी
उपक्रम, दिव्यांग खेळाडूंसह, संघटक, कार्यकर्ते, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक,
महिला मार्गदर्शक व संघटक, कार्यकर्ती यांचेसाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार
तसेच ज्येष्ठ क्रीडा महर्षीकरीता शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार
प्रदान करण्यात येतो.
सन २०१४-१५ सन २०१५-१६ व सन २०१६-१७ या
वर्षासाठी मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य संघटनेमार्फत त्या त्या आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय स्तरावरील कनिष्ठ व वरिष्ठ गटातील पदक विजेते पुरुष व महिला खेळाडू,
साहसी उपक्रम, दिव्यांग खेळाडूंसह, संघटक, कार्यकर्ते, क्रीडा मार्गदर्शक, महिला
मार्गदर्शक व संघटक, कार्यकर्ती यांचे विहित नमुन्यातील अर्ज संबंधित राज्य
संघटनेच्या कार्यकारीणीच्या ठरावासह ३० नोव्हेंबर, २०१७ पर्यंत ऑनलाईन मागविण्यात
येत आहे.
अर्जदाराने
आपल्या कामगिरीचा तपशिल देऊन विहीत नमुन्यात अर्ज ऑनलाईन पध्दतीने www.mumbaiaivsports.com
या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर सादर करावा. ऑनलाईन अर्जाची एक प्रत
अर्जदाराने संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात ५ डिसेंबर पूर्वी
स्वयं साक्षांकित प्रमाणपत्रांसह सादर करावी. यापूर्वी सन २०१४-१५ या पुरस्कार
वर्षासाठी ज्यांनी अर्ज सादर केलेले आहे. त्यांनी पुन्हा शासन निर्णयाच्या
नियमावलीनुसार नव्याने अर्ज सादर करावेत.
अधिक
माहितीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, विभागीय
उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, संबंधित विभाग अथवा संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी
यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन आयुक्त, क्रीडा व युवक सेवा
संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.
00000
No comments:
Post a Comment