Wednesday, 11 October 2017

ग्रामीण महाआरोग्य शिबिरात दीड लाख रुग्णांची तपासणी - जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर

     जळगाव, दि. 11 - फैजपूर येथे 2 ऑक्टोबर रोजी झालेल्या ग्रामीण महाआरोग्य शिबिराचा ग्रामीण भागातील दीड लाख रुग्णांनी लाभ घेतला आहे. या शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे निदान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे. अशा रुग्णांची सविस्तर माहिती जमा करण्याचे काम आशा वर्कर व अंगणवाडी सेविकामार्फत सुरु करण्यात आले आहे. शस्त्रक्रिया करणे आवश्यक असलेल्या प्रत्येक रुग्णांची मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टर शस्त्रक्रिया करणार येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली. 
     2 ऑक्टोबर रोजी फैजपूर येथे झालेल्या पहिल्या ग्रामीण महाआरोग्य शिबिराची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. बैठकीस पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील, जलसंपदा मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी संतोष जाधव, जी. एम. फाउंडेशनचे रामेश्वर नाईक, पितांबर भावसार, अरविंद देशमुख यांचेसह जिल्हयातील तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
     फैजपूर येथे झालेल्या पहिल्या ग्रामीण महाआरोग्य शिबिराचा लाभ जिल्हयातील चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड या तालुक्यांसह नंदूरबार, बऱ्हाणपूर व गुजरात मधील दीड लाखापेक्षा अधिक रुग्णांनी घेतला आहे. नागरीकांना लाभ होईल अशा उपक्रमांना प्रशासन नेहमीच मदत करेल असे सांगून जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर म्हणाले की, तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांची माहिती आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांनी जमा करुन ती तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे द्यावी. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णाचे निदान बघून शस्त्रक्रिया करणे आवश्यक असलेल्या रुग्णांची माहिती फाउंडेशनकडे द्यावी. त्यांनतर रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले.
मानवतेच्या दृष्टिकोणातून डोळस नजरेने बघितल्यास अंधाना दृष्टि देवू शकतो- डॉ. लहाने
    फैजपूर येथे झालेल्या पहिल्या ग्रामीण महाआरोग्य शिबिरात 32 हजार रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली आहे. 2 हजार रुग्णांना चष्मे वाटप केले आहे तर 950 रुग्णांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याची माहिती पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली. आशा वर्कर, आंगणवाडी सेविका, व वैद्यकीय अधिकारी यांनी शस्त्रक्रिया कराव्या लागणाऱ्या रुग्णांची माहिती जमा करतांना मानवतेचा दृष्टिकोण ठेवून डोळस नजरेने बघावे. जेणेकरुन आपण अंधांना दृष्टि देवू शकू असा आशावादही डॉ. लहाने यांनी व्यक्त केला.
     या शिबिरासाठी मायलॉन कंपनीने एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याचे निदान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले असेल अशा प्रत्येक रुग्णांस ने-आण करणे व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. हे काम शेवटच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया होईपर्यंत पुढील सहा महिने सुरु राहणार आहे. यासाठी तज्ज्ञ डॉक्टर जिल्हयात दर आठवड्याला येणार आहे. मोठया स्वरुपाच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय ऑपरेशन थिअेटर उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती रामेश्वर नाईक यांनी बैठकीत दिली.
     शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या व शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे निदान केलेल्या सर्व रुग्णांनी आपल्या गावातील आशा वर्कर व आंगणवाडी सेविकांना आपली तपासणीची माहिती द्यावी. तसेच त्यांचेकडील फॉर्म भरुन देण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी रुग्णांना केले आहे.
                                                                    000

No comments:

Post a Comment