Monday, 30 October 2017

ज्ञान आणि विज्ञानाची सांगड घालून कॅन्सरसारखा आजार रोखता येतो - जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर



             



           जळगाव, दि. 30 - कॅन्सर हा असाध्य आजार असला तरी या आजाराची प्राथमिक लक्षणे ओळखता आल्यास ज्ञान आणि विज्ञानाची सांगड घालून हा आजार रोखता येतो. यासाठी नागरीकांनी कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराच्या प्राथमिक लक्षणांची माहिती करुन घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले.
          जागतिक स्तन कॅन्सर जनजागृती मासानिमित्त जिल्हा नियोजन भवनात मुक्ती फाऊंडेशनच्यावतीने शासकीय महिला अधिकारी, कर्मचारी यांचेकरीता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीमती बबिता कमलापूरकर, कॅन्‌सर तज्ञ डॉ. निलेश चांडक व त्यांचे आई-वडिल उपस्थित होते.
            उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, विशेषत: कॅन्सर हा आजार तंबाखु, सुपारीसारख्या पदार्थापासून होतो. उपस्थितांनी या आजाराविषयीची माहिती जाणून घ्यावी व ती इतरांनाही सांगावी. या आजाराविषयी जनजागृती होणे आवश्यक असून याची लक्षणे ओळखता आल्यास त्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून निदान करुन घेता येईल व त्यावर त्वरीत उपचार घेता येतील. डॉ. निलेश चांडक यांनी कॅन्सरविषयीची कार्यशाळा घेऊन समाजसेवेचे व्रत जोपासले आहे.  ग्रामीण भागात जनजागृतीचे काम आशा वर्कर व आंगणवाडी सेविका करीत असतात. त्यांना या आजाराविषयीची माहिती दिल्यास त्या ग्रामीण भागातील महिलांपर्यंत या आजाराविषयी चांगल्याप्रकारे जागृती करतील. डॉ. चांडक यांनी आशा वर्कर व आंगणवाडी सेविकांसाठी कार्यशाळा घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.
            स्तनाच्या कॅन्सरबाबत महिलांनी जागृत राहिले पाहिजे. छोटीशी गाठ असली तरी त्याचे डॉक्टरांकडून निदान करुन घेतले पाहिजे. महिलांनी या आजाराबाबत अधिक दक्ष राहण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी केले.
            स्तनाचा कॅन्सर हा आजार झपाटयाने वाढत असून हा आजार रोखण्यासाठी महिलांनी योग्य आहार, व्यायाम व योगा यास प्राधान्य दिले पाहिजे.आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश अधिक असावा तर साखर व तेलाचे प्रमाण कमी असावे असा सल्ला कॅन्सर तज्ञ डॉ. निलेश चांडक यांनी दिला. त्याचबरोबर कॅन्सरचे प्रकार, कॅन्सर होण्याची कारणे, कॅन्सर रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आदिंबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
            कार्यशाळेस शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच नर्सिंगचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
000

No comments:

Post a Comment