Monday, 30 October 2017

हवाईदल भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात - जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर





            जळगाव, दि. 30 - मुलजी जेठा महाविद्यालय येथे 7 ते 10 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या हवाईदल मेळाव्यासाठी मोठया प्रमाणात उमेदवार उपस्थित राहणार आहे. या उमेदवारांना कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवू नये. यासाठी त्यांना आवश्यक त्या प्राथमिक सुविधा संबंधित यंत्रणांनी  उपलब्ध करुन द्याव्यात. असे निर्देश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिले.
            जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या भरती मेळाव्याच्या पूर्वतयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन रतन पारखे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार अधिकारी अनिसा तडवी, यांचेसह सार्वजनिक बांधकाम, महानगरपालिका, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व इतर विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
            या भरती मेळाव्यास अगोदरच्या दिवसापासूनच उमेदवार शहरात येण्यास सुरुवात होईल. या उमेदवारांना राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, पिण्याचे पाणी, सार्वजनिक शौचालयाची सुविधा ठिकठिकाणी उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच भरतीसाठी मैदानावर लागणाऱ्या आवश्यक त्या सुविधांबरोबर अग्निशमन यंत्रणा, ॲम्बुलन्स सुविधा तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध ठेवण्यात यावा. भरती मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे घ्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी या भरती मेळाव्यासाठी संबंधित विभागांनी केलेल्या तयारीचाही आढावा घेतला.                                     000

No comments:

Post a Comment