Wednesday, 10 October 2018

‘लोकराज्य’मधील यशकथा ठरतील प्रेरणादायी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर




‘लोकराज्य’ ऑक्टोबरच्या अंकाचे लोकार्पण संपन्न
 जळगाव, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या ऑक्टोबर 2018 च्या अंकातील विविध यशकथा शेतकरी, नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी आज येथे केले.
            जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या दालनात आज दुपारी ‘लोकराज्य’ च्या माहे ऑक्टोबरच्या विशेषाकांचे प्रकाशन त्यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, माहिती अधिकारी जगन्नाथ पाटील माहिती सहाय्यक गोपाल साळुंखे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी  श्री. निंबाळकर म्हणाले, ‘लोकराज्य’ मासिकाला संदर्भ मूल्य आहे. यामध्ये शासनाच्या विविध योजनांसह शासकीय माहिती, शेतकऱ्यांनी राबविलेले नावीण्यपूर्ण उपक्रम, शासनाच्या उपक्रमांची माहिती असते. ‘लोकराज्य’चा माहे ऑक्टोबरच्या अंकात महाराष्ट्राच्या परिवर्तन कथांचा समावेश आहे. त्या शेतकरी आणि नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘लोकराज्य’ अत्यंत महत्वपूर्ण असून विद्यार्थ्यांनी ‘लोकराज्य’चे वाचन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी केले. जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांनी ‘लोकराज्य’ मधील परिवर्तन कथांची माहिती दिली. जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांनी प्रास्ताविक केले. माहिती अधिकारी श्री. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तर श्री. साळुंखे यांनी आभार मानले.
०००००

No comments:

Post a Comment