Monday, 29 October 2018

प्रत्येक खेळाडूने सांघिक भावनेने खेळून स्पर्धेत प्राविण्य प्राप्त करावे -- पशुसंवर्धन मंत्री ना. महादेव जानकर







जळगाव, दि. 29 :- स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंनी सांघिक भावनेने खेळून वेगवेगळया खेळात प्राविण्य प्राप्त करावे. व आपल्या विभागाचे नाव रोशन करावे. असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री ना. महादेव जानकर यांनी आज केले.
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, जळगाव येथे ऑल इंडिया रेल्वे प्रोटेक्शन फोर्स ॲथलेटीक्स चॅम्पीयनशिप 2018 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी आकशात फुगे सोडून व क्रिडाज्यो‍त पेटवून उदघाटन केले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर महापौर सिमा भोळे, आमदार सुरेश  भोळे, मध्ये रेल्वे प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त अतुलकुमार श्रीवास्तव, मुख्य सुरक्षा आयुक्त अलोक बोहरा, भुसावळ मंडळाचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त अजय प्रकाश घुले, भुसावळ रेल्वे प्रबंधक आर. के. यादव आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. जानकर म्हणाले की, रेल्वे विभागाने सन 2018 च्या ॲथलेटीक्स चॅम्पीयनशिप स्पर्धेचे अतिशय सुंदर आयोजन केले आहे. या स्पर्धेतून प्राविण्य मिळविणारे खेळाडू भारतीय पोलीस डयुटी मेरिट मध्ये रेल्वे विभागाचे नाव सर्वोच्च स्थानावर नेतील अशी मला आशा आहे.  भविष्यात हे खेळाडू आशिया क्रीडा स्पर्धेत चमकतील. या स्पर्धेसाठी भारतातील वेगवेगळया रेल्वे विभागातून 300 ते 350 पुरुष व महिला खेळाडू सहभागी झाले आहेत. या खेळाडूंनी खेळात चांगले प्रदर्शन करुन भविष्यात होणाऱ्या  स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न  करावा  असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी भुसावळ मंडळाचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त अजय दुबे आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, या  स्पर्धेच्या आयोजनासाठी जळगाव व भुसावळ विभागातील सर्वांचे सहकार्य मिळाले आहे. सुरक्षा खेळाडूंनी रेल्वेतील सुरक्षा करावी पण त्याचबरोबर खेळालाही महत्व दिले पाहिजे,  क्रिडा स्पर्धेत सहभागी होवून चांगली कामगिरी करण्यासाठी खेळाडूना सर्व मदत करण्यात येईल.
यावेळी मंत्री महोदयांच्या व मान्यवरांच्या हस्ते  800 मीटर धावणे पुरुष स्पर्धेत गोल्ड मेडल विजेते सुनिल कुमार, सिल्वर मेडल गर्जेंद्र कुमार व कास्य मेडल जितेंद्र कुमार तसेच 800 मीटर धावणे महिला स्पर्धेत गोल्ड मेडल रेणुका पी,  सिल्वर मेडल फर्जना अंन्सारी तर कास्य मेडल अस्पा भारती या खेळाडूंना प्रमाणपत्र देवून सन्मानीत करण्यात आला.
 रेल्वे सुरक्षा दलाच्या अखिल भारतीय मैदानी स्पर्धा तीन दिवस चालणार असून या स्पर्धेत लांब उंडी, 800 मीटर अडथळयांची शर्यत, उंच उंडी, भालाफेक, गोळाफेक आदि स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत विविध रेल्वे विभागातून महिला व पुरुष खेळाडू सहभागी झालेले आहेत.
०००००

No comments:

Post a Comment