Friday, 26 October 2018

अ‍ॅग्रोवर्ल्डचे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल -अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी व दुग्ध प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार हरिभाऊ जावळे यांचा विश्वास




 जळगाव दि. 26:- दोलायमान झालेल्या निसर्गचक्रामुळे शेतकऱ्यांची अवस्था आज अतिशय बिकट झाली आहे. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. अशा स्थितीत शेती करणे अत्यंत  जोखिमीचे झाले आहे. या परिस्थितीवर मात करायची असेल तर शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची कास धरावी लागेल. याच नवतंत्रज्ञानाची ओळख शेतकऱ्यांना अ‍ॅग्रोवर्ल्डच्या राज्यस्तरीय कृषी व दुग्ध प्रदर्शनातून होणार असल्याने हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही, असा विश्वास रावेरचे आमदार हरिभाऊ जावळे यांनी व्यक्त केला.
अ‍ॅग्रोवर्ल्डच्यावतीने येथील शिवतीर्थ मैदानावर आयोजित केलेल्या चार दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी दुपारी 12 वाजता झाले. याप्रसंगी ते बोलत होते.  उद्घाटन सोहळ्याला महापौर सीमा भोळे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, जैन इरिगेशनचे महाराष्ट्र विपणन प्रमुख अभय जैन, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक के. डी. महाजन, प्लँटो कृषितंत्रचे व्यवस्थापकीय संचालक स्वप्निल चौधरी, क्वालिटी ठिबकचे रमेश पाटील, ग्रब अ‍ॅग्रोटेकचे संचालक कैलास मगर, अ‍ॅग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण उपस्थित होते.
आमदार हरिभाऊ जावळे पुढे म्हणाले की, अ‍ॅग्रोवर्ल्डचे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन म्हणजे शेती व शेतीशी निगडीत माहितीचा खजिनाच आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती  कशी करावी, याचा नवदृष्टीकोन शेतकऱ्यांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळण्यास मदत होईल. या कृषी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना निश्चितच उभारी मिळेल, असेही ते  म्हणाले. कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर सर्व मान्यवरांनी प्रदर्शनात लावण्यात आलेल्या सर्व स्टॉल्सला भेटी देऊन माहिती जाणून घेतली. अ‍ॅग्रोवर्ल्ड हे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजक आहेत. जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ प्रदर्शनाचे प्रायोजक असून, प्लँटो कृषितंत्र, दत्त ड्रीप, द-लवाल, सोनालिका ट्रॅक्टर, ग्रब अॅग्रो, न्यूइरा व गोदावरी फाउंडेशन हे सहप्रायोजक आहेत. चार दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनासाठी राज्य शासनाचा कृषी विभाग, जिल्हा परिषद जळगाव, आत्मा जळगाव यांचे  सहकार्य आहे. प्रदर्शनात कृषी विभागाच्यावतीने विविध दालने उभारण्यात आली आहेत. त्यात शासकीय योजनांची माहिती, कृषी निविष्ठा, पाणलोट व्यवस्थापन याची माहिती शेतकऱ्यांना मिळेल. विशेष म्हणजे प्रदर्शनस्थळी धान्य महोत्सव देखील भरविण्यात आला आहे. शेतकरी ते ग्राहक अशा थेट विक्रीचा उद्देश त्यामागे आहे. शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती  व्हावी म्हणून अ‍ॅग्रोवर्ल्डकडून कृषी प्रदर्शनात विविध दालनांची रचना करण्यात आली आहे. विशेषत: पॉली हाऊस, शेडनेट, मल्चिंग, विविध आकार प्रकारातील शेततळे, त्यासाठीचा कागद, शेततळ्यातील मोती संवर्धन, गांडूळ शेती अशा बाबी प्रदर्शनस्थळी मांडण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणार आहे.
कृषी प्रदर्शनातील  लोकराज्य स्टॉल मान्यवरांची भेट
ॲग्रवर्ल्ड कृषी प्रदर्शनत राज्य शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य मासिकाचा स्टॉल लावण्यात आला आहे. सदर स्टॉलला उदघाटन समारंभानंतर आमदार श्री. हरिभाऊ जावळे, पोलीस अधीक्षक श्री. दत्तात्रय शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी आयुक्तालयाचे पुणे येथील कृषि उपसंचालक डॉ. राम लोकरे, कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी भेट दिली. यावेळी ऑक्टोबर 2018 मध्ये प्रकशित झालेल्या लोकराज्य मासिकांतील कृषी विषयक योजना व इतर लेखाबद्दल सुरेश सानप यांनी मान्यवरांना माहिती दिली. आमदार श्री. जावळे यांनी जिल्हयातील कृषी विषयक कार्यक्रमांची माहिती लोकराज्य मासिकांत सामावेश करण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे असे सूचित केले.
210 हून अधिक कंपन्यांचा सहभाग
जिरायती व बागायती शेतीविषयक गरजांचा अभ्यास करून तसेच संभाव्य दुष्काळी परिस्थितीत पशुपालन व चारा व्यवस्थापनावर प्रदर्शनात भर देण्यात आला आहे. नवयुगाशी सुसंगत असलेले हे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन अत्याधुनिक डोम स्ट्रक्टरमध्ये आयोजित केले असून, त्यात 210 हून अधिक नामवंत कंपन्यांनी सहभाग नोंदविला आहे. नवनवीन यंत्रे, तंत्रे,  सिंचन प्रणाली, विविध आकार व प्रकारातील शेततळे, ट्रॅक्टर्स, अवजारे, स्प्रे पंप, फळबाग छाटणीपासून ते परसबागेतील मशागतीच्या कामांसाठी उपयुक्त शेती साहित्ये, मोत्यांच्या  शेतीचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना सर्व शासकीय योजनांच्या माहितीसह कर्जाबाबत बँकांचे स्टॉल्स व प्रोजेक्ट रिपोर्ट याची एकाच छताखाली माहिती मिळणार आहे. प्रदर्शनस्थळी ट्रॅक्टर, शेती अवजारे व मशिनरी स्वत: हाताळून खात्री करण्यासाठी स्वतंत्र जागा राखीव ठेवली आहे. याशिवाय पशुपालकांसाठी हिरव्या चाऱ्याचे व्यवस्थापन तसेच  दुष्काळी परिस्थितीत फायदेशीर ठरणाऱ्या मुरघास, हायड्रोपोनिक फॉडर, अ‍ॅझोलाची प्रात्यक्षिकाचीही मांडणी प्रदर्शनात केली आहे. दूध काढणी यंत्रांच्या नामांकित कंपन्यांचेही स्टॉल्स  याठिकाणी आहेत.             
                                                          000000








No comments:

Post a Comment