Saturday, 20 January 2018

जलसमृध्दी (अर्थमुव्हर्स) यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजनेचा जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी लाभ घेण्याचे आवाहन 31 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक



          जिमाका-जळगाव, दि. 20:- शासनाने राज्यातील जलयुक्त शिवार अभियान / जल व मृद संधारणाची कामे करण्यासाठी जलसमृध्दी ( अर्थमुव्हर्स) यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजना  नुकतीच सुरु केलेली आहे.
            या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना (सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी उत्पादक कंपनी, बेरोजगारांच्या सहकारी संस्था, नोंदणीकृत गटशेती, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था) यांना वित्तीय संस्था / बँकेकडुन 17 लाख 60 हजार रुपयांपर्यंत (बिनव्याजी कर्ज ) अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्यांकडे स्वत:च्या मालकीची यंत्रसामुग्री नसावी. तसेच स्वत:चा हिस्सा किमान 20% टक्के पर्यंत उभारणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी 11 जानेवारी, 2018 ते 31 जानेवारी 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना आपले अर्ज http//eme.mahaonline.gov.in व testeme.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर भरता येतील.
            प्रथम टप्यामध्ये या योजनेचा कालावधी 31 मार्च, 2018 पर्यंत राहणार आहे. जळगाव जिल्ह्यासाठी 25 लाभार्थी निवडण्यात येणार आहे. लाभार्थींच्या निवडीसाठी सुशिक्षीत बेरोजगार, शेतकरी उत्पादक कंपनी, बेरोजगारांच्या सहकारी संस्था, नोंदणीकृत गटशेती, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था याप्रमाणे प्राधान्यक्रम राहणार आहे. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची निवड करणेसाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा जिल्हा मृदसंधारण अधिकारी, जळगाव यांच्या अध्यक्षेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये  कार्यकारी अभियंता, लघुसिंचन, (जलसंधारण) तथा जिल्हा संधारण अधिकारी, जळगाव हे सदस्य तर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव हे सदस्य सचिव राहणार आहे.
            या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी घेण्यासाठी व आवश्यक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव या कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन  विशाल जाधवर, सदस्य सचिव, जिल्हास्तरीय समिती तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००००

No comments:

Post a Comment