जिमाका- जळगाव, दि. 10:- कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी देशभर राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम
राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून जिल्ह्यात स्पर्श जनजागृती अभियान
राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत प्रजासत्ताक दिनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत
कुष्ठरोग मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण
करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची शपथ नागरीकांना देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन
कार्यक्रमाची व्यापक प्रमाणात जनजागृती होण्यासाठी जिलहाधिकारी कार्यालयात
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अपर
जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, उपजिल्हाधिकारी
अभिजित भांडे पाटील, पोलीस उप अधिक्षक रशीद तडवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता
कमलापूरकर, डॉ. शेखर पाटील, डॉ. भारतीय, डॉ. संपदा गोस्वामी आदि उपस्थित होते.
या अभियानाच्या जनजागृतीसाठी 30
जानेवारी ते 13 फेब्रुवारी हा पंधरवाड्यात जिल्हयात जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यात
करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत 328 संशयित रुग्ण आढळून आले आहे. या रुग्णांवर
शासकीय रुगणालयात मोफत उपचार करण्यात येत असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी
बैठकीत सांगितले.
त्याचबरोबर या बैठकीत राष्ट्रीय तंबाखू
नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. तंबाखु नियंत्रणासाठी जिल्ह्यात
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. या
पथकामार्फत अचानक विविध ठिकाणी भेटी देऊन तपासणी करण्यात येणार आहे. तंबाखु
नियंत्रणासाठी जिल्हयातील शाळांची तसेच विविध शासकीय कार्यालयांची तपासणी करण्यात
येणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत सांगितले. तसेच तालुका व गाव
पातळीवरही अंमलबजावणी पथकामार्फत धडक मोहिम राबविण्याच्या सुचना जिल्हाधिकारी
यांनी या बैठकीत संबंधित विभागास दिल्या. या कार्यक्रमांतर्गत जिल्हयात डिसेंबर
मध्ये राबविण्यात आलेल्या मौखिक आरोग्य तपासणीचाही आढावा जिल्हाधिकारी यांनी
घेतला.
000
No comments:
Post a Comment