Thursday, 25 January 2018

प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्कवर आयोजित संचलनात कृषि विभागाच्या 'उन्नत शेती समृद्ध शेतकरी' चित्ररथाचा समावेश

         जळगाव, दि. 25 - 'शेतक-यांचे उत्पन्न सन 2022 पर्यंत दुप्पट करणे' या मा.पंतप्रधानांच्या संकल्पावर आधारित राज्याच्या कृषि विभागाचे प्रधान सचिव श्री. विजय कुमार आणि कृषि आयुक्त श्री. सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली 'उन्नत शेती समृद्ध शेतकरी' या विषयावर आधारीत चित्ररथाचे संचलन 26 जानेवारी, 2018 रोजी शिवाजी पार्क, मुंबई येथे मा.राज्यपाल व मा.मुख्यमंत्री यांचे उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रमामध्ये होणार आहे.
          राज्यात खरीप हंगाम 2017 पासून 'उन्नत शेती समृद्ध शेतकरी' अभियान राबविण्यास सुरुवात झाली. तालुका हा कृषि विकासाचा घटक ठेवून, कृषि विषयक तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचविण्याकरिता, गावागावांत कृषि वार्ताफलक तयार केले. रोहिणी नक्षत्राच्या कालावधीत राज्यातील सर्व गावांमध्ये कृषि जनजागृती पंधरवडा साजरा झाला. या दरम्यान शेतावर प्रत्यक्ष भेटी, शेतकरी मेळावे, सभा, चर्चासत्रे इत्यादींच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. कृषि विद्यापीठांच्या आणि कृषि विभागाच्या तज्ञांमार्फत गावपातळीवर शेतक-यांना प्रशिक्षित केले.
         शेतकरी समूहाद्वारे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पीक प्रात्यक्षिके घेतली. मजूर टंचाईवर मात आणि उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी कृषि यांत्रिकीकरणावर भर देण्यात येत आहे. शेतक-यांनी स्वतःच्या पसंतीनुसार औजारे खरेदी केल्यावर अनुदानाचे पैसे थेट त्यांच्या बॅंक खात्यावर जमा होत आहेत. ज्या शेतक-यांना स्वतःची औजारे खरेदी करणे शक्य नाही त्यांच्याकरिता भाडेतत्वावर कृषि औजारे बॅंका स्थापन झाल्या. प्रति थेंब अधिक उत्पादनाकरिता ठिबक सिंचनाच्या योजनेत सुलभता आणि पारदर्शकता आणली. शेतमालाला चंगला बाजारभाव मिळण्यासाठी स्वच्छता आणि प्रतवारी करण्यासाठी शेतक-यांचे प्रबोधन करण्यात येत आहे.
         कमी खर्चात जास्तीत जास्त उच्च दर्जाचे उत्पादन काढून राज्यातील शेती आणि शेतकरी समृद्ध होण्याच्या दिशेने वाटचाल चालू आहे.   
          अशा सर्व घटकांचा एकात्मिक दृश्य दर्शविणारा कृषि विभागाचा चित्ररथ सादर करण्यात येणार आहे. कृषि विभागाच्या या चित्ररथाची उभारणी मे. प्रसिद्धी ॲडव्हर्टाइज, पुणे यांचेमार्फत केली आहे.
                                                                              000

No comments:

Post a Comment