Saturday, 27 January 2018

प्रजासत्ताक दिन सोहळा सौदार्हपूर्ण सामाजाच्या निर्मितीसाठी एकसंघ भावनेतून कृतीशील होऊ या - ना. अर्जून खोतकर प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा












जळगाव, दि. २६ - राज्याच्या विकासाच्या कल्पक आणि नाविन्यपूर्ण योजना, संकल्पना राबवून सामाजिक सलोखा, बंधुभाव, सौदार्हपूर्ण समाजाच्या निर्मितीसाठी एकसंघ भावनेतून कृतीशील होण्याचा संकल्प आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण साऱ्यांनी करु या, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व वस्त्रोद्योग राज्यमंत्री ना. अर्जून खोतकर यांनी आज येथे केले.
 येथील पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभानंतर ना. खोतकर यांनी उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ना. खोतकर म्हणाले की, न्याय, समता, स्वातंत्र्य या लोकशाहीच्या उदात्त मुल्यांची देणं देणारी आपली राज्यघटना जगातील एक आदर्श राज्यघटना आहे. या राज्यघटनेमुळे देशाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि औद्योगिक या सर्वच क्षेत्रात गतीमान वाटचाल सुरु आहे. सुरक्षा, आरोग्य, सामाजिक समता आणि समतोल विकास या संकल्पनांना केंद्रस्थानी ठेवून देशाची वाटचाल सुरु आहे. देशाच्या प्रगत वाटचालीत महाराष्ट्राचे योगदान उल्लेखनीय राहिलेले आहे. साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा, कृषि, शिक्षण, आरोग्य, नैसर्गिक साधनसंपत्ती, औद्योगिक, पर्यटन यासह वैचारिक चिंतनाची प्रगल्भ परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राची भविष्यातही अशीच वाटचाल होत रहावी. यासाठी आपण सगळे मिळून विकासाच्या कल्पक आणि नाविण्यपूर्ण योजना, संकल्पना राबवू या. असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
शानदार संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम
या कार्यक्रमात ना. अर्जून खोतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत झाले.  त्यानंतर पोलीस दलामार्फत मानवंदना देण्यात आली. तसेच त्यांनी उघड्या जीप मधून परेडची पाहणी केली. परेडचे नेतृत्व प्रशिक्षणार्थी पोलीस उप अधिक्षक धनजंय पाटील यांनी केले. यावेळी झालेल्या संचलनात पोलीस मुख्यालय, महिला व पुरुष पथके, वाहतुक शाखा, होमगार्ड महिला व पुरुष पथके, ओरीयन इंग्लिश स्कुल, ए. टी. झांबरे विद्यालय, आर. आर. माध्यमिक विद्यालय, मुलजी जेठा विद्यालय,सेंट जोसेफ इंग्लिश मिडीयम स्कुल, ला. ना. माध्यमिक विद्यालय, सिध्दी विनायक इंग्लिश स्कुल, काशीबाई उखाजी कोल्हे इंग्लिश स्कुल, सेंट टेरेसा इंग्लिश स्कुल, बेंडाळे महिला महाविद्यालय, ॲग्लो उर्दू विद्यालय, श्रीराम माध्यमिक विद्यालय या विद्यालयांच्या एन.सी.सी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे पथक, आर.एस.पी पथके, स्काऊट-गाईड पथक, राष्ट्रीय सेवा योजना आदी पथकांनी सहभाग घेतला व शानदार संचलन केले. तसेच पोलीस दलाचे बॅण्ड पथक, श्वान पथक, बॉम्ब शोधक पथक, वरुण रथ, निर्भया पथक, महापालिकेचे अग्निशामक व बचाव पथक, ॲम्बुलन्स 108, तसेच मुद्रा बँक योजना प्रचार व प्रसार समन्वय समितीतर्फे तयार करण्यात आलेला प्रधानमंत्री मुद्रा योजना, महिला व बालविकास विभागाचा बेटी बचाओ बेटी पढाओ, कृषि विभागाचा जलयुक्त शिवार, महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा सर्व शिक्षा अभियान, सामाजिक वनीकरण विभागाचा झाडे लावा, झाडे जगवा आदि चित्ररथांनी सहभाग घेतला. पोलीस दलाच्या वाद्यवृंदाने वाजविलेल्या देशभक्तीपर गितांच्या धुनवर झालेल्या शिस्तबद्ध आणि जोशपूर्ण संचलनाने कार्यक्रमस्थळावरील वातावरण भारावले होते. परेड निरिक्षणानंतर ना.खोतकर यांच्या हस्ते सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्यातर्फे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर पोलीस दलात शौर्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल योगेश तांदळे, युवराज रबडे, अजितसिंग देवरे, युवराज पाटील, नंदकिशोर सावखेडकर यांचा तर सामाजिक वनीकरण विभागातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेता रुपेश बिऱ्हाडे, राष्ट्रीय कार्यक्रमात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल विनोद अहिरे व ग्रुप आणि डॉ. प्रा. अनिता पाटील, डॉ. निलेश चांडक, मुकुंद गोसावी यांचाही मंत्रीमहोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  
यावेळी विविध शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यात पोलीस बॉईजचे चित्तथरारक कराटे प्रात्यक्षिके, तन्मय मल्हारा याचे योगा पिरामिड, गुरुवर्य शाळेमधील मुलांच्या समूह नृत्याचा समावेश होता.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास आमदार चंदुलाल पटेल, महापौर ललीत कोल्हे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील, उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव, तहसीलदार अमोल निकम, तहसीलदार मंदार कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वातंत्र्य सैनिक, विद्यार्थी, नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्याचे सुत्रसंचालन श्रीमती उषा शर्मा, जी. एम. उस्मानी, राजेश यावलकर यांनी केले.
ऐ मेरे वतन के लोगो…
देशभक्तीपर चित्रप्रदर्शनास ना. खोतकर यांची भेट

            भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांच्या संकल्पनेतून जळगाव जिल्हा पोलिस दलातर्फे तयार करण्यात आलेल्या ए मेरे वतन के लोगो… या देशभक्तीपर चित्र प्रदर्शनास ना. अर्जून खोतकर यांनी भेट देऊन प्रदर्शनाची पाहणी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातही जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील, उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव, तहसीलदार अमोल निकम, तहसीलदार मंदार कुलकर्णी, यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र सैनिक, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजवंदन
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत टप्पा क्रमांक ३ च्या आवारातही सकाळी आठ वा. ध्वजवंदन करण्यात आले. उपवनसंरक्षक एम. आदर्शकुमार रेड्डी यांच्या हस्ते ध्वजवंदन करुन सामुहिक राष्ट्रगीत गायन करुन राष्ट्रध्वजास अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा उपनिंबधक विशाल जाधवर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, सहायक मुद्रांक अधिकारी सुनील पाटील, उपविभागीय कृषि अधिकारी गोरख लोखंडे, तालुका कृषि अधिकारी विजय भारंबे यांचेसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००

No comments:

Post a Comment