Tuesday, 23 January 2018

शुक्रवारपासून शहरात खान्देश महिला महोत्सवाचे आयोजन महिला आरोग्य तपासणी शिबिरासह प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्रात कर्तृत्व गाजवणा-या स्त्री व्यक्तिमत्वांच्या प्रकट मुलाखतींचेही आयोजन



 
           जळगाव, दि. 23 - स्त्रीशक्तीच्या सन्मानार्थ आणि त्यांच्यातील कला कौशल्याला तसेच उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला व बाल विकास विभाग व जळगाव शहर महानगरपालिकेच्या वतीने येत्या शुक्रवारपासून बँ. निकम चौक मैदान (सागरपार्क) येथे खान्देश महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 26 ते 29 जानेवारी 2018 या कालावधीत या महोत्सवात भव्य अशा महिला आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी अत्यंत अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमला पाचारण करयात आले आहे. चार दिवस चालणा-या या महोत्सवात गृहोपयोगी वस्तुच्या प्रदर्शन विक्रीसोबतच दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, गीत-संगीत आणि महाराष्ट्रात कर्तृत्व गाजवणा-या भगिनींच्या प्रकट मुलाखतींचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त किशोर राजे निंगाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, महानगरपालिकेचे अपर आयुक्त राजेश कानडे, सागर महाजन आदि उपस्थित होते.
         प्रामुख्याने महिलांचे आरोग्य, स्वच्छता अभियान, खान्देशची खाद्यसंस्कृती या संकल्पनांवर आधारित हा महोत्सव येथील बँ. निकम चौक मैदानात (सागर पार्क ) होत असून, महिला आरोग्य तपासणीसोबतच विविध गृहोपयोगी वस्तुंचे प्रदर्शन व विक्री, जळगावकर खवैय्यांसाठी खान्देशी खाद्य पदार्थ्यांची मेजवानी, दररोज सांस्कृतिक व मनोरंजक कार्यक्रम, महिला उद्योजक व बचतगटाच्या उद्यमशील महिलांसाठी तसेच शहरातील माता-भगिनींसाठी आरोग्य विषयक सेमिनार, कार्यशाळा, व्याख्याने असा भरगच्च कार्यक्रमांचा नजराणा खान्देश महिला महोत्सवाच्या निमित्ताने जळगावकरांना अनुभवता येणार आहे. महोत्सवाच्या ठिकाणी शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती नागरिकांना उपलब्घ करुन देण्यासाठी स्टॉल लावण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
      महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांसंदर्भात समाजात जागर व्हावा, शहर स्वच्छता अभियानात नागरिकांचे उत्स्फूर्त योगदान वाढावे, खान्देशातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे, शहरातील विद्यार्थीनी महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ व वाव मिळावा. हे या खान्देश महिला महोत्सवाच्या आयोजनाचा मुख्य हेतू आहे.
         खान्देशात महिला मोठया प्रमाणावर उद्यमशील आहेत. विविध बचत गट हे त्याचे उत्तम उदाहरण मानता येईल. महिलांच्या याच उद्योजकतेला प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी त्याच्या आरोग्यविषयक समस्यांवर जनजागृती करण्यासाठी, शहरात उत्सव आणि उत्साहाचं वातावरण निर्माण करण्यासाठी खान्देश महिला महोत्सव चे आयोजन करण्यात आलेले आहे.
    या महोत्सवात विविध महिला बचत गट, गृहोद्योग, लघुउद्योगांचा समावेश असणार आहे. महोत्सवाच्या चार दिवसात विविध चविष्ट खाद्य पदार्थ, बचत गटांनी बनविलेल्या विविध आकर्षक कलाकुसरीच्या वस्तु, सांस्कृतिक कार्यक्रमासह या चार दिवसात विविध क्षेत्रातील मान्यवर व सेलिब्रेटिंच्या भेटींचे नियोजन आहे. खान्देशातील महिला उद्योजकतेतही पुढे असून त्या सर्वाना एका छताखाली एकत्र आणून प्रोत्साहित करण्याचा उद्देशही जळगाव महानगरपालिकेचा या महोत्सवामागील आहे. तरी महिला उद्योजक व महिला बचत गटांनी आपली उत्पादने हजारो ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी संपर्क करावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
सांस्कृतिक तसेच मनोरंजनपर कार्यक्रमात कौशल्य सादरीकरणाची संधी
        खान्देश महिला महोत्सवात शालेय विद्यार्थीनी, महाविद्यालयीन युवती, तसेच भगिनींना आपल्यातील कला कौशल्याचं सादरीकरण करुन हजारो रसिकांची मने जिंकता येणार आहेत. गीत, संगीत, नृत्य, अभिनय अशा विविध कलांमध्ये पारंगत असणा-या कलावंतांनी खान्देश महिला महोत्सवात सादरीकरण करण्यासाठी बँ. निकम चौक मैदान (सागर पार्क) येथे सुरु असलेल्या संपर्क कार्यालयात अधिक माहितीसाठी येवून नावनोंदणी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी केले आहे.
०००

No comments:

Post a Comment