जिमाका-जळगाव. दि. 16:- राज्य शासनाचे मुखपत्र असलेल्या ‘लोकराज्य’
मासिकाचा जानेवारी 2018 चा पोलीस विशेषांक प्रकाशित झाला आहे. हा अंक स्मार्ट,
समर्थ, संवेदनशील ‘आपले पोलीस, आपली अस्मिता’ यावर आधारित आहे. पोलीस विशेषांक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने
प्रकाशित करण्यात आला आहे.
पत्रकार
दिनाचे औचित्य साधून या अंकाचे विमोचन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर व जिल्हा
पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात
आले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा माहिती अधिकारी
विलास बोडके यांचेसह विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती
होती.
‘लोकराज्य’
चा पोलिस विशेषांक पोलिस विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त
असा आहे. अंकातील माहिती पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ज्ञानात भर घालणारी आहे.
या अंकामधील माहितीमुळे पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक सक्षमतेने
काम करण्यास मदत होणार आहे. तसेच हा अंक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी
प्रेरणादायी असल्याचे मत प्रमुख अतिथींनी विमोचनाप्रसंगी व्यक्त केले.
‘लोकराज्य’
च्या पोलीस विशेषांकात महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात पोलिसांचा मोठा हातभार
लागला असून दहशतवाद, नक्षलवाद, सायबर गुन्हेगारी, आर्थिक गुन्हेगारी या प्रकारच्या
आव्हानांचा सामना महाराष्ट्र पोलिस समर्थपणे करीत असल्याची माहिती आहे. सुरक्षित,
सुव्यवस्थित महाराष्ट्र यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रतिसाद आणि प्राधान्य
यावर गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, तंत्रज्ञानाच्या वापराला अग्रक्रम
यावर गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजीत पाटील यांनी विशेष लेखाच्या माध्यमातून
विचार व्यक्त केले आहे. त्याचबरोबर या अंकात अपर मुख्य सचिव (गृह) सुधीर
श्रीवास्तव, पोलीस महासंचालक सतीश माथूर यांचेसह पोलीस दलातील अनेक वरिष्ठ
अधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले आहे.
या अंकाची किंमत केवळ दहा रुपये असून वार्षिक
वर्गणी फक्त शंभर रुपये आहे. हा विशेषांक विक्रीसाठी जिल्हा माहिती कार्यालय,
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टप्पा क्र. 3, पहिला मजला, आकाशवाणी केंद्राजवळ, जळगाव
येथे उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी दिली आहे.
०००००
No comments:
Post a Comment