जिमाका-जळगाव,
दि. 5:- जिल्हा व विभागनिहाय पीक
पद्धतीनुसार केवळ नोंदणीकृत व शिफारस केलेल्याच कीटकनाशकांच्या विक्रीवर नियंत्रण
आणण्यासाठी धोरण निश्चित करण्यात येत आहे. यासाठी या क्षेत्रातील नागरीकांकडून
सुचना व अभिप्राय मागविण्यात येत आहेत. नागरीकांनी आपल्या सुचना व अभिप्राय लिखित
स्वरूपात मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य,
सेंट्रल बिल्डिंग, पुणे - 411001 या पत्त्यावर किंवा cqcopest@gmail.com या ईमेलवर पाठविण्याचे आवाहन आयुक्त
कृषि, महाराष्ट्र राज्य, पुणे
यांनी केले आहे.
कीटकनाशके फवारणीमुळे होणारी मनुष्य व
प्राण्यांच्या जीवीत हानीबरोबरच, शिफारस नसलेली कीटकनाशके व त्यांचा अयोग्य
प्रमाणात वापर याचा पर्यावरणाबरोबरच मनुष्य व प्राण्यांच्या अन्न घटकांमध्ये
कीटकनाशकांचे हानीकारक अंश सापडून आरोग्य समस्या निर्माण झालेल्या आहेत. यासाठी
राज्य शासनामार्फत यापुढे जिल्हा व विभागनिहाय पिक पद्धतीनुसारच केवळ नोंदणीकृत व
शिफारस केलेल्याच कीटकनाशकांच्या विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठीचे धोरण निश्चित
करण्यात येत आहे.
राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात
येते की, केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती (CIB & RC), फरिदाबाद यांनी
शिफारस केल्याप्रमाणेच कीटकनाशकांचा वापर करावा. तसेच सर्व कीटकनाशके उत्पादक,
वितरक व विक्रेत्यांनी शिफारशी नसलेल्या कीटकनाशकांची विक्री होणार नाही याची
दक्षता घ्यावी. विक्रेत्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पिक पद्धतीनुसार आवश्यक
त्या पिकांची, कीडरोग नियंत्रणाचीच कीटकनाशके विक्री करावीत.
केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती,
फरिदाबाद यांनी पिकनिहाय शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा तपशिल कृषि विभागाच्या http://krishi.maharashtra.gov.in/ या वेबसाईटमधील निविष्ठा मेनुतील कीटकनाशक या
पर्यायातंर्गत दिलेल्या ‘सर्वसाधारण माहिती’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे आयुक्त
कृषि, महाराष्ट्र राज्य, पुणे
यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment