Wednesday, 24 January 2018

अमळनेर व चोपडा कृषि उत्पन्न बाजार समित्यांचा ई-नाम योजनेत समावेश ई-नाम योजनेत समावेश होण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन



        जळगाव, दि. 24 - जिल्ह्यातील अमळनेर व चोपडा या कृषि उत्पन्न बाजार समित्यांचा ई-नाम योजनेत समावेश झाला आहे. ई-नाम योजनेची माहिती सर्व शेतकरी बांधवांना होण्याच्या दृष्टीने बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील मोठ्या दहा गावांमध्ये 26 जानेवारी, 2018 रोजी आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच शेतक-यांची नोंदणी सुध्दा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आपली नोंदणी करुन घ्यावी. या योजनेतंर्गत नोंदणी करण्यासाठी त्यांच्या आधारकार्ड क्रमांक, बँक खातेक्रमांक (IFSC कोडसह), रहिवासी पत्ता (पिनकोड सह)  आदि माहिती ग्रामसभेस येतांना सोबत आणावी. असे आवाहन विशाल जाधवर,  जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव यांनी केले आहे.
          गावांची नावे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, तसेच कृषि उत्पन्न बाजार समिती, अमळनेर व चोपडा यांच्या सुचना फलकावर प्रसिध्द करण्यात येत आहेत.
           शेतमालाच्या खरेदी व विक्रीसाठी केंद्र शासनाच्या कृषि व शेतकरी कल्याण विभागामार्फत राष्ट्रीय कृषि बाजार (नाम) कार्यान्वित केले आहे. नामचे कामकाज ई-ट्रेडींग प्लॅटफॉर्म व्दारे सुरु आहे. यात बाजार समित्यांमध्ये ऑनलाईन पध्दतीने शेतमालाचे लिलाव (ई-ट्रेडींग) करण्यात येतात.
          या लिलाव प्रक्रियेमध्ये संपूर्ण पारदर्शकता राहणार असून शेतक-यांच्या बँक खात्यामध्ये थेट पैसे त्याचदिवशी जमा करण्यासाठी ई-पेमेंटची सुविधा आहे. राष्ट्रीय स्तरावरील ई-बाजारामुळे जास्तीत जास्त व्यापारी लिलावात सहभागी होणार असल्याने शेतमालाच्या विक्रीबाबत स्पर्धा निर्माण होऊन शेतक-यास योग्य मोबदला मिळण्यास मदत होणार आहे. या योजनेतंर्गत केंद्र शासनाकडून ई- नाम मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या बाजार समित्यांना प्रत्येकी 30 लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील कामकाज सुरु झाले असल्याची माहिती श्री. जाधवर यांनी दिली आहे.
००००००

No comments:

Post a Comment