Thursday, 25 January 2018

ऐ मेरे वतन के लोगो… देशभक्तीपर चित्रप्रदर्शनाचे आयोजन प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जळगाव पोलीस दलाचा अनोखा उपक्रम






        जळगाव, दिनांक 25 - भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत जळगाव जिल्हा पोलिस दलातर्फे शाळकरी विद्यार्थ्यांसाठी पोलिस दल-सैन्याने गाजविलेल्या शौर्यावरील छायाचित्र व शस्त्रांचे ए मेरे वतन के लोगो… या देशभक्तीपर चित्र प्रदर्शनाचे येथील पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल मध्ये आयोजन करण्यात आले.
            राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदामंत्री ना.गिरीष महाजन यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात 26/11 च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेच्यावेळी तीन दिवसात पोलीसांनी दिलेल्या कडव्या लढ्याबाबत केलेले मदत कार्य भितीच्या सावटाखाली असणाऱ्या मुंबईकरांचे जनजीवन सुरळीत करण्यासाठी पोलीस दलाने केलेल्या प्रयत्नांची व ऑपरेशन यशस्वीतेच्या छायाचित्रांची मांडणी करण्यात आली आहे.त्याचबरोबर महाराष्ट्रातील नक्षलप्रभावीत गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादाच्या (माओवादी) समस्येवर प्रकाशझोत टाकून तेथील आदिवासी जनजीवन, नक्षलवादी चळवळ व संघटन त्यांच्या विघातक कारवाया, तेथील विकासकामात अडथळै आणणाऱ्या बाबी, नक्षलविरोधी अभियानात महाराष्ट्र शासन व गडचिरोली पोलीस दल करत असलेले प्रयत्न त्याचबरोबर U N MISSION IN KOSOVA 2002 चे नेतृत्व करणारे पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी व त्यांच्या पथकाने केलेल्या कामगिरीचे, तसेच वाहतुक नियमांचे पालन करणेबाबतच्या छायाचित्रांची मांडणी आदि विविध जनजागृती आणि देशभक्तीपर पोस्टर या प्रदर्शनात मांडण्यात आले आहे. आठ दिवस चालणा-या चित्र प्रदर्शनाचा जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तसेच नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पोलिस दलातर्फे करण्यात आले.
            उद्घाटनाच्या वेळी या प्रदर्शनास जळगाव शहरातील विविध शाळांच्या शाळकरी मुलांनी भेट देऊन देशातील जवानांनी गाजविलेले रोमांच उभे करणा-या शौर्याचा अनुभव घेतला. देशभक्तींपर संगीताच्या धुनवर शस्त्र हाताळून आम्ही देशसेवेसाठी सज्ज असल्याची ग्वाही मुलांनी आज या प्रदर्शनात आल्यावर दिली.
            जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तायत्र कराळे यांच्या संकल्पनेतुन या चित्र व शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, अप्पर पोलिस अधिक्षक बच्चनसिंग, उप‍ विभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, परिविक्षाधीन पोलीस उप अधिक्षक धनंजय पाटील, गुन्हेशाखेचे पोलिस निरिक्षक सुनिल कुऱ्हाडे, राखीव पोलीस निरिक्षक सुभाष कावरे, सहायक पोलीस निरिक्षक सागर शिंपी आदिंची यावेळी उपस्थिती लाभली.
            हे चित्र प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी पोलीस निरिक्षक सुनिल कुऱ्हाडे यांच्या पथकातील सहायक पोलीस निरिक्षक सागर शिंपी, पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, सतीश हाळणोर, सहायक फौजदार श्री. कांबळे, मुलफर अली सय्यद, दिनेश बडगुजर, जयंत चौधरी, संदिप सावळे आदि परिश्रम घेत आहे.
000

No comments:

Post a Comment