Thursday, 25 January 2018

महाराष्ट्रीयन व ओडीसी नृत्यातुन झाला ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ चा लोकजागर भारत सरकारच्या गीत आणि नाटक विभागाचा उपक्रम











        जळगाव, दि . 25 - भारत सरकारच्या सुचना आणि प्रसारण मंत्रालय व गीत आणि नाटक विभाग, पुणेतर्फे येथील गांधी उद्यानात एक भारत श्रेष्ट भारत अंतर्गत ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या उपक्रमातंर्गत लोककलेतून लोकजागर या विशेष जनजागरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ओडीसा राज्यातील पुरी येथील कलाकरांनी गोटीपुवा या नृत्य कलाविष्काराच्या माध्यमातून तर पुणे येथील कलाकारांनी पोवाडा, लावणी, गोंधळ या महाराष्ट्रीयन लोककलांच्या माध्यमातून राज्यातील प्रसिध्द लोककलावंताच्या कलेचा अविष्कार बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमांतर्गत नागरीकांना येथे पाहण्यास मिळाला.
            बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील मानवसेवा विद्यालय, खुबचंद सागरमल विद्यालय, जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, आय. एम. आर. महाविद्यालय, वनिता विश्व महिला मंडळ, ओंकारेश्वर महिला भजनी ग्रुप, भरारी फाऊंडेशन, युवा प्रेरणा फाऊंडेशन, मुक्ती फाऊंडेशन, प्रविण पाटील फाऊंडेशन, नेहरु युवा केंद्र, नवीपेठ महिला मंडळ, जे. के. स्कुल यांचा गौरव करण्यात आला. तसेच मनोबल केंद्राची लक्ष्मी शिंदे व संजीवनी आवळे यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
            कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आली. त्यानंतर शाहिर देवानंद माळी यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. तसेच पुरी येथील प्रसिध्द लोककलापथकाने सुंदर गोटीपुवा नृत्य, शाहिर देवानंद माळी यांच्या कलापथकाने पोवाडा, पुणे येथील लोकजागृती पथकाने लावणी,  गोंधळी नृत्याच्या माध्यमातून बेटी बचाओ, बेटी पढाओ चा संदेश दिला.
            कार्यक्रमास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जैन उद्योग समुहाचे कॅप्टन मोहन कुलकर्णी, भारत सरकारच्या गीत व नाटक विभाग, पश्चिम क्षेत्र पुणे व या कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक डॉ. पंकज दाभाडे, समन्वयक मंदार गुप्ते आदि उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमात विविध कलाअविष्कारांच्या माध्यमातून आपली कला सादर केलेल्या कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
            कार्यक्रमाच्या शेवटी विनोद ढगे यांच्या कलापथकाने लोककलेतून बेटी बचाओ बेटी पढाओ संदेश देऊन कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.
            या कार्यक्रमास शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांचे व नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीसह नागरीक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व उपस्थितांचे आभार विनोद ढगे यांनी मानले.
000

No comments:

Post a Comment